Join us  

नौदलाला इंचभरही जमीन देणार नाही, नितीन गडकरींनी सुनावले, अधिका-यांची काढली खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 6:23 AM

निर्णयांना विरोध करण्याचीच आपल्याकडे मानसिकता आहे, असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मरिन ड्राइव्हवरील तरंगत्या हॉटेलला आक्षेप घेणाºया नौदल अधिका-यांची खरडपट्टी काढली.

मुंबई : निर्णयांना विरोध करण्याचीच आपल्याकडे मानसिकता आहे, असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मरिन ड्राइव्हवरील तरंगत्या हॉटेलला आक्षेप घेणाºया नौदल अधिका-यांची खरडपट्टी काढली. देशातील पहिल्या आंतराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचे गुरुवारी गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले. नौदल अधिकाºयांना दक्षिण मुंबईत एक इंचही जमीन देणार नाही, असेही गडकरी म्हणाले.मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे ३०० कोटी खर्चून उभारण्यात येणारे हे टर्मिनल जून २०१९पर्यंत बांधून तयार होणार आहे. सुमारे चार लाख चौरस फूट परिसरातील या टर्मिनलची वार्षिक प्रवासी क्षमता सात लाख असणार आहे. तर, २०४१पर्यंत २८ हजार ४०० कोटींच्या उलाढालीची क्षमता आहे. या टर्मिनलच्या भूमिपूजन सोहळ्यास गडकरी आणि फडणवीस यांच्यासह या वेळी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार राज पुरोहित, आशिष शेलार, मुंबई पोर्ट ट्रस्ट अध्यक्ष संजय भाटिया आदी उपस्थित होते. या वेळी गडकरी म्हणाले, अरबी समुद्र आणि त्याचा सागरी किनारा ही मुंबईची सर्वांत मोठी ताकद आहे. पण आतापर्यंत त्याचा योग्य वापर होऊ शकला नाही. सागरमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात २.४१ लाख कोटींच्या ८६ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. जेएनपीटीमधील सेझ प्रकल्पात मोठी गुंतवणूक येत असून तेथे येत्या काळात दीड लाख नवीन रोजगार निर्माण होतील. यातील ८० ते ९० टक्के रोजगार हे स्थानिकांना देण्यात येतील, असे ते म्हणाले.तर केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित सहभागातून मुंबईत मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकासाचे प्रकल्प सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईच्या पूर्व किनाºयाचा मोठा कायापालट होत आहे. पूर्वी फक्त खास लोकांसाठी खुले असलेले मुंबई पोर्ट ट्रस्ट आता सामान्यांसाठी खुले असेल. आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल, कोस्टल रोड, सी प्लेन, रोरो सेवा अशा विविध प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासदरात मोठी वाढ होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.२५ मार्चपर्यंत मुंबईतील रो-रो टर्मिनलचे काम पूर्ण करण्यात येणार असून साधारण एप्रिल महिन्यापासून हीसेवा कार्यान्वित होईल. मांडवा, नेरूळकडे रोरो सेवेच्या माध्यमातून वाहने गेल्यास वेळ आणि इंधनाची बचत होणार असून रस्त्यांवरील गर्दी कमी होण्यासही मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.या वेळी कोचीन शिपयार्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यामध्ये जहाज दुरुस्तीबाबत सामंजस्य करार करण्यात आला.सीमेवर लक्ष द्या!नितीन गडकरी म्हणाले, नौदलाने मरिन ड्राइव्हवर होणाºया तरंगत्या हॉटेलवर आक्षेप घेतला. त्यामुळे न्यायालयाने मनाई आदेश दिले. आता मलबार हिलमध्ये नौदलाने आक्षेप घ्यायचे काहीच कारण नव्हते. तुम्हाला दक्षिण मुंबईत सदनिका आणि क्वार्टर्स हवी आहेत. त्यासाठी एक इंचही जागा देणार नाही.नौदलाबद्दल आम्हाला आदरच आहे, पण तुमचे काम जेथून दहशतवादी घुसतात त्या सीमेवर आहे. त्यामुळे तिकडे जरा लक्ष द्यावे, असेही गडकरी यांनी सुनावले. विशेष म्हणजे, नौदलाच्या पश्चिम तळाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांच्या उपस्थितीत गडकरींनी नौदलाचा ‘वर्ग’ घेतला.

टॅग्स :नितिन गडकरी