Join us

कोविड रुग्णांसाठी नऊशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:11 IST

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे कोविडच्या संभाव्य ...

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत अशा आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेमार्फत १२०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेण्यात येत आहेत. यापैकी तीनशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पालिकेला प्राप्त झाले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्यतज्ज्ञांनी वर्तविला असल्याने पालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यात कोविडचे नवे रूप असलेल्या डेल्टा प्लसचा प्रसारही होऊ लागला आहे. यामुळे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नुकतेच आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानुसार खाटा वाढवणे, औषधांचा साठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा याची खातरजमा करणे सुरू आहे.

मुंबईत दररोज २३५ मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजनची गरज भासते. मात्र एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची दररोजची मागणी २७० मेट्रिक टनावर पोहोचली होती. याची गंभीर दखल घेऊन १२०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेण्यात येत आहेत. यातील ३०० मशीन पालिकेने याआधीच ताब्यात घेतल्या आहेत, तर उर्वरित ९०० कॉन्सन्ट्रेटर लवकरच घेण्यात येणार आहेत. या प्रत्येक मशीनसाठी सुमारे ८५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

* कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची मागणी वाढली होती. त्यामुळे महापालिकेने अन्य कोणावर अवलंबून न राहता ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली.

* ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण झाल्यास एका कॉलवर अर्ध्या तासात २५ जंबो सिलिंडर पोचविण्यासाठी सहा वाहने तैनात ठेवण्यात आली आहेत.

* पालिका जम्बो कोविड केंद्र आणि प्रमुख रुग्णालयांच्या १६ ठिकाणी हवेतील ऑक्सिजन निर्मिती करीत आहे. तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक याप्रमाणे ४० मेट्रिक टन क्षमतेचे दोन द्रव रूप वैद्यकीय प्राणवायू साठा केंद्र उभारण्यात येत आहेत. शहर भागात जंबो आणि ड्युरा सिलिंडर्स पुनर्भरणा केंद्र उभारण्यात येत आहेत.