नव्या वर्षी मुंबईसाठी ७६ हजार कोटींचे प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 03:54 AM2019-12-31T03:54:53+5:302019-12-31T06:51:15+5:30

मेट्रो प्रकल्पासाठी ४४ हजार ८६९ कोटी; एमएमआरडीएचा दर्जेदार पायाभूत सुविधा देण्यावर भर

New Year, Rs | नव्या वर्षी मुंबईसाठी ७६ हजार कोटींचे प्रकल्प

नव्या वर्षी मुंबईसाठी ७६ हजार कोटींचे प्रकल्प

googlenewsNext

मुंबई : नवीन वर्षात मुंबईकरांना मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) विविध विकास प्रकल्पांची भेट देणार आहे. एमएमआरडीएचे हे प्रकल्प ७६,२९९ कोटी रुपयांचे आहेत. आगामी दोन वर्षांसाठीच्या प्रकल्पांसाठी हा खर्च येणार आहे. मुंबईकरांसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहे. आगामी दोन वर्षांत मुंबईकरांना चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

एमएमआरडीए मुंबई मेट्रो मार्ग २ - अ (दहिसर-डीएन नगर), मेट्रो मार्ग ७ (दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व) या मार्गांचे काम पुढील वर्षअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. याशिवाय आगामी दोन वर्षांत मेट्रो मार्ग २ अ (डीएन नगर-मंडाले) आणि मार्ग-४ (वडाळा-कासारवडवली) आणि मेट्रो मार्ग- ६ (स्वामी समर्थ नगर-विक्रोळी) या मार्गांवरील कामे पूर्ण होतील. या मार्गांवरून मेट्रो धावण्यास सुरुवातझाल्यानंतर जवळपास ५० लाख प्रवासी ९८ मेट्रो स्थानकांतून प्रवास करतील. या मेट्रो मार्गांमुळे मुंबई उपनगरी रेल्वेमार्गावरील ३५ टक्के प्रवासी मेट्रोतून प्रवास करू शकतील.

मेट्रो प्रकल्पावर ४४ हजार ८६९ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. मुंबईकरांचे सुखकारक, आरामदायी प्रवासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ५५०पेक्षा अधिक इंजिनीअर्स, ८५०० हजार कुशल, ९५०० हजार अकुशल कामगार सातत्याने काम करत आहेत. मेट्रो प्रकल्पामुळे स्टील, सिमेंट, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आदींसह इतर क्षेत्राला फायदा मिळत आहे.

एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव म्हणाले की, शहर पूर्वीपेक्षा अधिक वेगवान होईल. शिवाय विना अडथळा,वाहतूक व्यवस्थेला फार त्रास होऊ न देता काम करणे हे आव्हानात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

रस्ते वाहतुकीसाठी ३१ हजार ४३० कोटींचा खर्च
मेट्रो प्रकल्पाशिवाय, रस्ते वाहतुकीच्या प्रकल्पावर ३१ हजार ४३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) आणि विरार-अलिबाग मल्टि मोडल कॉरिडोर प्रकल्पांचा समावेश आहे. १७ हजार ८४३ कोटी रुपये खर्च करून शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प बांधण्यात येणार असून, हा मार्ग सहा पदरी असणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान असणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे. त्याशिवाय या प्रकल्पातील पूल शिवडी-वरळीलादेखील जोडण्यात येणार आहे. त्याशिवाय कोस्टल रोड प्रकल्प आणि पश्चिम द्रुुतगती महामार्गावरील वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्यात येणार असल्याचेही एमएमआरडीएमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: New Year, Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.