Join us  

Gudi Padwa 2018 : वर्ष नवे, पर्व नवे, आरंभ नवा; मुंबईत आज स्वागतयात्रांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 3:01 AM

गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागतयात्रा मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतात. यंदाही मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक स्वागतयात्रा मुंबईकरांना पाहण्यास मिळणार आहेत. भगवे फेटे, नऊवारी साड्या, सदरे कुर्ते, भगवे झेंडे, रांगोळ्या, चित्ररथ, प्रतिकृती, देखावे यांच्या सोबतीला ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल असे वातावरण संपूर्ण मुंबईत असणार आहे.

मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागतयात्रा मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतात. यंदाही मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक स्वागतयात्रा मुंबईकरांना पाहण्यास मिळणार आहेत. भगवे फेटे, नऊवारी साड्या, सदरे कुर्ते, भगवे झेंडे, रांगोळ्या, चित्ररथ, प्रतिकृती, देखावे यांच्या सोबतीला ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल असे वातावरण संपूर्ण मुंबईत असणार आहे.मुंबईतील अनेक मंडळांनी गेल्या काही दिवसांपासून शोभायात्रांची तयारी सुरू केली असून शनिवारी रात्रीपर्यंत पताका लावणे, झेंडे सजवणे, चित्ररथ आणि देखावे उभारण्याचे काम अनेक ठिकाणी सुरू होते. स्वागतयात्रा आता फक्त गिरगावपुरत्या मर्यादित राहिल्या नसून मुंबईभर मोठमोठ्या स्वागतयात्रा आयोजित केल्या जाऊ लागल्या आहेत. शेकडो तरुण-तरुणी ढोल-ताशांचा नाद करताना, नऊवारी नेसून बुलेट किंवा दुचाकी चालविणाऱ्या तरुणी, तर धोतर, सदरा-लेंग्यात दुचाकीवर मिरवणुकीत सहभागी झालेले तरुण; असेच काहीसे चित्र मुंबापुरीत आज असणार आहे.गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे लालबाग-परळ येथे गुढीपाडव्यानिमित्ताने शोभायात्रा काढण्यात येणार आहे. मुंबईचे डबेवाले व स्वामी समर्थ सेवा मठ यांच्या हस्ते पालखी पूजन केले जाईल. स्वरतालीम व रुद्रभैरव प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक यांचे वादन होईल. सर्वोत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा (स्त्री व पुरुष), युवकांसाठी बाइक व सायकल रॅली आणि ऋतुराज स्पोर्ट अ‍ॅकॅडमी मल्लखांब प्रात्यक्षिके इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. शोभायात्रा रविवार, सकाळी ७ वाजता सुरू होईल. शोभायात्रेची सुरुवात श्री स्वामी समर्थ मठ, परळ रेल्वे वर्कशॉप येथून होईल. यात्रेची सांगता चिंचपोकळी पूर्वेकडील सणसवाडी रहिवासी संघ पटांगणात होईल.भारतीय जनता पार्टी चेंबूर विधानसभा, वॉर्ड क्रमांक १५२ तर्फे ‘हिंदू नववर्ष शोभायात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. चेंबूर येथील एन. जी. आचार्य मार्ग, सुभाषनगर येथील भाजपा कार्यालयाजवळ रविवारी सायंकाळी ४ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या वेळी भाजपा मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार, मुंबई प्रदेश संगठन मंत्री सुनील कर्जतकर, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर आदी उपस्थित राहतील.गिरगाव येथील स्वामी मुक्तानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्वागतयात्रेला गिरगावातील फडके श्री गणेश मंदिरापासून सुरुवात होईल. १ हजार २०० तरुण-तरुणी या स्वागतयात्रेमध्ये वादन करणार असून शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ यामध्ये सामील केला जाणार आहे.साम्राज्य प्रतिष्ठानतर्फे मानखुर्द येथील जयहिंद नगर ते म्हाडा वसाहत दरम्यान स्वागतयात्रा काढण्यात येईल. या वेळी मोठ्या संख्येने विभागातील रहिवाशांनी उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन साम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवदास वाघमारे यांनी केले आहे.गोरेगाव पूर्वेकडील बावटेवाडी येथील श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘गोरेगाव सांस्कृतिक सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे.शोभायात्रेची सुरुवात श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ श्रेयश कॉलनी येथून, पहाडी शाळा आरे रोड, आय. बी. पटेल रोड, जयप्रकाशनगर, गोरेगाव स्थानक, दत्त मंदिर चौक, गोगटेवाडी, नाईकवाडी, पेरुबाग, आसाराम बापू आश्रम येथे सांगता होईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष निशांत सकपाळ यांनी दिली.चेंबूर प्रतिष्ठानतर्फे ‘हिंदू ऐक्याचे धार्मिक व सांस्कृतिक एकत्रीकरण’ आणि ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद चौक (चेंबूर नाका) येथे रविवारी सकाळी ८.३० वाजता स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. यात लेझीम पथक, जिम्नॅस्टिक्स, वेशभूषा, ढोलताशे यांची प्रात्यक्षिके सादर होतील.दरम्यान, शोभायात्रा मुक्तीनगर (घाटला) ते स्वामी विवेकानंद चौक (चेंबूर नाका) अशी निघेल. शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टॅग्स :गुढीपाडवा २०१८