Join us  

स्वाती म्हसे-पाटील यांच्याकडे नवीन जबाबदारी

By संजय घावरे | Published: April 19, 2024 7:03 PM

प्रशासकीय कामावर उत्तम पकड असलेल्या तसेच लेखन-वाचनाची आवड असलेल्या आणि कवी मनाच्या स्वाती म्हसे पाटील यांनी महामंडळाच्या पायाभूत सोई-सुविधांच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे संचालकपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर सांगितले.

मुंबई - महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकारी असलेल्या स्वाती म्हसे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी गुरुवारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

प्रशासकीय कामावर उत्तम पकड असलेल्या तसेच लेखन-वाचनाची आवड असलेल्या आणि कवी मनाच्या स्वाती म्हसे पाटील यांनी महामंडळाच्या पायाभूत सोई-सुविधांच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे संचालकपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर सांगितले. तसेच चित्रीकरणाची संख्या वाढविण्याबरोबरच निर्मात्यांना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करण्यासाठीही प्रयत्नशील राहीन असेही त्या म्हणाल्या. त्याचबरोबर महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही प्रलंबित प्रश्न मार्गी लावून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

प्रशासनाचा गाढा अभ्यास असणाऱ्या स्वाती म्हसे-पाटील या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९९३ रोजी उप जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाल्या. त्यावर्षी एमपीएससीतून राज्यात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला होता. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षीच शासकीय सेवेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आजपर्यंत शासनाच्या विविध विभागात, विविध पदांवर त्यांनी तब्बल ३१ वर्ष सेवा बजावली असून या कार्यकाळात अनेक महत्वाचे आणि लोकाभिमुख निर्णय त्यांनी घेतले आहेत.

२०२१ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिव पदी केली होती. त्यावेळी स्वाती म्हसे-पाटील यांनी माहिती तंत्रज्ञानाचा अचूक वापर आणि नियोजनबद्ध कामकाज करून विभागाचा कारभार गतिमान केला. विशेष म्हणजे २०२०-२१ च्या परीक्षा वेळापत्रानुसार घेण्याचे नियोजनही त्यांनी पार पाडले. तसेच २०१९ ते २०२१ काळातील रखडलेले प्रलंबित निकाल लावून विद्यार्थ्यांना दिलासा दिला. त्याचबरोबर नागरी पुरवठा विभागात कार्यरत असताना ग्राहक संरक्षणाकरीता महत्वाची भूमिका त्यांनी बजावली. स्वस्त धान्य दुकानांचे संपूर्ण संगणकीकरण केले. त्यामुळे विभागात पारदर्शकता आली.