खांदेरीचा ऐतिहासिक वारसा पुढे नेण्यासाठी नवीन पिढी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 06:43 AM2019-09-29T06:43:07+5:302019-09-29T06:43:35+5:30

अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त नेक्स्ट जनरेशन ‘खांदेरी’ पाणबुडी नौदलाच्या सेवेत रुजू होताना, ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून काही विशिष्ट व्यक्ती शनिवारी मुंबईतील कार्यक्रमात उपस्थित होत्या.

A new generation ready to carry on the historic legacy of Khanderi | खांदेरीचा ऐतिहासिक वारसा पुढे नेण्यासाठी नवीन पिढी सज्ज

खांदेरीचा ऐतिहासिक वारसा पुढे नेण्यासाठी नवीन पिढी सज्ज

Next

- खलील गिरकर
मुंबई : अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त नेक्स्ट जनरेशन ‘खांदेरी’ पाणबुडी नौदलाच्या सेवेत रुजू होताना, ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून काही विशिष्ट व्यक्ती शनिवारी मुंबईतील कार्यक्रमात उपस्थित होत्या. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ६ डिसेंबर, १९६८ मध्ये भारतीय नौदलात रुजू झालेल्या आयएनएस खांदेरीमध्ये त्यांनी काही काळ सेवा बजावली होती. काही जणांनी तर १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी या पाणबुडीत पाण्याखाली राहून देशाचे रक्षण करण्याचे कर्तव्य बजावले होते. शनिवारी खांदेरी याच नावाने ही नवीन पाणबुडी नौदलाच्या सेवेत रुजू झाली. या कार्यक्रमास हजर असलेले निवृत्त अधिकारी, कर्मचारी हे त्या काळातील आठवणींना उजाळा मिळाल्याने गहिवरून गेले. खांदेरीचा ऐतिहासिक वारसा ही खांदेरी व त्यावरील अधिकारी, सैनिक निश्चितपणे पुढे नेतील, असा विश्वास निवृत्त अधिकाऱ्यांनी थरथरत्या आवाजात व्यक्त केला. एका परीने जुन्या खांदेरीचा जणू पुनर्जन्म झाल्याची भावना त्यांच्यामध्ये होती.

रशियातील रिगा येथे पहिल्या खांदेरीचा भारतीय नौदलात समावेश झाला होता. पहिले कमांडिंग आॅफिसर दिवंगत एम. एन. वासुदेवा यांनी त्यावेळी याची कमाडिंग आॅफिसर म्हणून सूत्रे स्वीकारली होती. दोन दशकांच्या प्रदीर्घ सेवेनंतर १८ आॅक्टोबर, १९८९ला तिला सेवेतून निवृत्त करण्यात आले होते.

आता या पाणबुडीचे कमांडिंग आॅफिसर म्हणून जबाबदारी कॅप्टन दलबीर सिंह यांच्यावर आहे. खास उत्तराखंड येथून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तेजसिंह करायत, यू. एस.भोज, चंदीगड येथून आलेले बलबीर डी. त्रेहान हे जुन्या खांंदेरीवर १९७१च्या युद्धात २७ नोव्हेंबर ते युद्ध बंद होईपर्यंत पाण्याखाली होते. पुण्याहून आलेले कॅप्टन केशव आजरेकर व कमांडर विजय वढेरा हे १९७५ ते १९७७ या कालावधीत त्यावर कार्यरत होते. सुमारे २०पेक्षा अधिक अधिकारी शनिवारच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. काही कर्मचा-यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या पत्नी या कार्यक्रमासाठी खास उपस्थित होत्या. खांदेरीमधील वास्तव्याच्या आठवणी सांगताना अधिकाºयांचा कंठ दाटून आला होता. खांदेरीचा ऐतिहासिक वारसा पुढे नेण्यासाठी कॅप्टन दलबीर सिंह व त्यांच्या पथकाची नवीन पिढी सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

‘जुन्या खांदेरीचा पुनर्जन्म झाल्याची माजी अधिकाºयांमध्ये भावना खांदेरी ही नवीन पाणबुडी नौदलाच्या सेवेत रुजू झाली. ही पाणबुडी नवी असली, तरी तिला देण्यात आलेले नाव जुनेच आहे. त्यामुळे त्या काळी याच नावाच्या पाणबुडीवर सज्ज असलेले (डावीकडून) उत्तराखंडमधून आलेले तेजसिंह करायत, यू.एस.भोज तर चंदीगड येथून आलेले बलबीर डी. त्रेहान हे थरथरत्या हातांनी एकमेकांना धरून हा कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. जुन्या खांदेरीचा जणू पुनर्जन्म झाल्याची भावना त्यांच्यामध्ये होती.

दुसºया छायाचित्रात (डावीकडून) या कार्यक्रमास उपस्थित असलेले कमांडर विजय वढेरा व कॅप्टन केशव आजरेकर. पुण्याहून आलेले कॅप्टन केशव आजरेकर व कमांडर विजय वढेरा हे १९७५ ते १९७७ या कालावधीत खांदेरीवर कार्यरत होते.


‘किनारा सुरक्षित राहिल्यास व्यापारावर अनुकूल परिणाम’
 
मुंबई : सागरी किनारा सुरक्षित राहिल्यास देशाच्या व्यापारावर त्याचा अनुकूल परिणाम होतो. अरबी समुद्र, हिंद महासागरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाईचा इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आयएनएस खांदेरी या डिझेल व इलेक्ट्रिकवर चालणाºया दुसºया पाणबुडीला शनिवारी नौदलात समाविष्ट करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रदेशात त्यांच्या किल्ल्याच्या नावावरून नाव दिलेली खांदेरी पाणबुडी आता कार्यरत होत असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.

भारतीय नौदलात असलेला आत्मविश्वास इतरांमध्ये नाही. शांतताप्रेमी देशांसाठी नौदलाची भीती नाही. मात्र, जे गडबड करण्याचा प्रयत्न करतील, त्यांना धडा शिकविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल करमवीर सिंह, नौदलाच्या पश्चिमी विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल अजित कुमार पी., व्हाइस अ‍ॅडमिरल ए. के. सक्सेना, माझगाव डॉकचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक कमोडोर (नि.) राकेश आनंद, खांदेरीचे कमांडिंग आॅफिसर कॅप्टन दलबीर सिंह व फ्रान्सचे राजदूत उपस्थित होते.

भारतात अत्याधुनिक पाणबुडी निर्मिती होत असल्याचा अभिमान आहे, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुकाने सांगितले. भारत व फ्रेंचमधील सहकार्याचे धोरण नवीन उंची गाठेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. आयएनएस विक्रमादित्यवर एक रात्र व दिवस राहून पाहणी दौरा करणार असून, नौदलाच्या शक्तीचा अनुभव घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. समुद्री चाच्यांविरोधात नौदलाने केलेल्या कडक कारवाईमुळे पायरसी व इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे ते म्हणाले.

Web Title: A new generation ready to carry on the historic legacy of Khanderi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.