मुंबई : स्तनाच्या कर्करोगावर उपचार घेताना शरीरावर इतर दुष्परिणाम कमी करणाऱ्या औषधाचा शोध घेण्यात यश आले असून याने औषधोपचारानंतर पुन्हा कर्करोग होण्याचे प्रमाणही कमी होणार आहे़ टाटा मेमोरियल रुग्णालय आणि इतर २६ देशातील तज्ज्ञांनी मिळून हे सर्वेक्षण केले होते. मासिक पाळी जाण्याआधीच महिलांना स्तनाच्या कर्करोग होण्याचे प्रमाण भारतामध्ये जवळपास ५५ टक्के इतके आहे. मासिक पाळी जाण्याआधीच स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांसाठी नवीन औषध खूपच उपयोगी असल्याचे एका सर्वेक्षणामध्ये आढळले आहे.‘न्यू इंग्लड जरनल आॅफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणामध्ये हे आढळले आहे.जुन्या औषधाचा परिणाम महिलांच्या थेट आरोग्यावर होत होता. या औषधामुळे दुसऱ्या पातळीवरचा कर्करोग होण्याचा धोका जास्त होता आणि रक्ताच्या गुठळ्या व्हायच्या. मात्र अॅरोमॅटिस इनहिबीटर एक्समेंट्स या नवीन औषधामुळे मृत्यूच्या प्रमाणात घट होईलच, असे आताच सांगता येत नाही. मात्र महिलांच्या आयुष्यमान नक्कीच उंचावेल़या सर्वेक्षणाच्या पाहणीनुसार, अॅरोमॅटीस इनहिबीटर एक्समेंट्स या औषधामुळे महिलांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचे प्रमाणामध्ये घट झालेली आहे. तसेच पुन्हा कर्करोग होण्याच्या प्रमाणातही घट झालेली आहे. मासिक पाळी जाण्याच्या आधी एखाद्या महिलेला स्तनाचा कर्करोग झाला तर तिला टॅमोक्सिफेन हे औषध दिले जायचे. मात्र या औषधाच्या दुष्परिणांमाचे प्रमाण जास्त होते. इंटरनॅशनल बे्रस्ट कॅन्सर स्टडी ग्रुपतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ४ हजार ९०० महिलांचा समोवश करण्यात आला होता. यापैकी ७८ महिला या टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या होत्या. एकूण पाच वर्ष हे सर्वेक्षण सुरू होते. पाच वर्षे केलेल्या सर्वेक्षणामध्ये नवीन औषध अत्यंत उपयुक्त असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञ मंडळीने काढला आहे, कारण नवीन औषध दिलेल्या ९२.८ टक्के महिलांचा स्तनाचा कर्करोग पूर्णपणे बरा झाला. जुन्या औषधाचा वापर केल्यास हे प्रमाण ८८.८ टक्के इतके होते. (प्रतिनिधी)
कर्करोगासाठी कमी दुष्परिणामाचे नवीन औषध
By admin | Updated: June 12, 2014 02:48 IST