Join us  

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचे नवे संचालक डॉ. प्रकाश महानवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 12:27 AM

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या संचालक पदासाठी नुकत्याच आॅनलाइन मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यामध्ये मुंबईच्या ...

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या संचालक पदासाठी नुकत्याच आॅनलाइन मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यामध्ये मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक डॉ. प्रकाश महानवर यांची आयडॉलच्या पूर्णवेळ संचालकपदी निवड करण्यात आली. डॉ. प्रकाश महानवर यांनी आयडॉलचा पदभार स्वीकारला आहे. ते पॉलिमर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.

डॉ. प्रकाश महानवर हे शिक्षण क्षेत्रात २८ वर्षांपासून कार्यरत असून मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील पॉलिमर आणि सरफेस इंजिनीअरिंग या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तसेच तेथे ते मानव संसाधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही कार्यरत होते.

डॉ. प्रकाश महानवर यांनी केमिकल व प्लास्टिक टेक्नॉलॉजीमधून बीएस्सी व एमएस्सी केले असून पॉलिमर क्षेत्रात पीएचडी केली आहे. त्यांच्या नावे पॉलिमर क्षेत्रात संशोधनपर ५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंट्स असून २ पेटंट्ससाठी अर्ज केलेला आहे. त्यांनी आजपर्यंत ११२ संशोधनपर शोधनिबंध लिहिले असून यातील अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी आजपर्यंत ३२ संशोधनपर प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २१ विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली असून ९ विद्यार्थी पीएचडी करीत आहेत.

उपसंचालकपदी डॉ. मधुरा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. त्या पूर्वी आयडॉलमध्येच सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्या आयडॉलच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या प्रभारी म्हणून कार्य करीत होत्या.

आयडॉलमध्ये विविध उपक्रम राबविणार

कोविड १९ च्या कालावधीत दूर व मुक्त शिक्षणाचे महत्त्व वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आयडॉलमध्ये संचालक व उपसंचालक पदाच्या विद्यापीठाने नियुक्त्या केल्या आहेत. नवनियुक्त संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी आयडॉलमध्ये विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. यामध्ये कौशल्यावर आधारित नवीन पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणे, विद्यार्थ्यांसाठी विविध आॅनलाइन सुविधा उपलब्ध करणे. आयडॉलचे आॅटोमेशन करणे, विविध महाविद्यालयात आयडॉलची केंद्रे सुरू करणे, शैक्षणिक मार्गदर्शनासाठी आभासी वर्ग सुरू करणे, असे अनेक शैक्षणिक व विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :मुंबई