Join us  

अब्रू वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारणाऱ्या मुलीची नीलम गोऱ्हेंनी घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 10:08 PM

मुलीची हॉस्पिटलमधून रवानगी केल्यानंतर तिच्या घरी मदत करण्याच्या सूचनाही आ.डॉ.गोऱ्हे यांनी नालासोपारा शिवसेना शहरप्रमुख श्री जितू शिंदे यांना दिल्या.

नालासोपारा येथे दि ३ एप्रिल, २०१८ रोजी ११ वर्षीय बालिकेने छेडछाडीस घाबरून जीव वाचवण्यासाठी चौथ्या मजल्यावरून उडी मारली होती. आज शिवसेना विधानपरिषद प्रतोद (मंत्री दर्जा) आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुंबईतील नायर इस्पितळात या मुलीची व तिच्या कुटुंबियांची भेट घेतली, विचारपूस केली व धीर दिला. मुलीच्या जबाबात अधिक माहिती तिने नोंदवली असून तिच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. प्रकृती सुधारत असली तरी तिला वैद्यकीय सेवा व देखभालीची गरज दिसून आली. मुलीने जखमी झाली असली तरी पाचवीच्या परीक्षेत बसायची इच्छा व्यक्त केली. मुलीला नायर हॉस्पिटलचे डीन डॉ. रमेश भारमल, अतिरिक्त डीन डॉ.पंकजा आगल व डॉ.कुमार डोसा आर्थोपेडिक सर्जन यांच्या देखरेखीखाली उपचार होत असून आ.डॉ.नीलम गोर्हे यांनी त्यांच्या कडून सर्व माहिती घेतली. सायकीअँट्री, पेडीयाट्रिक व ऑर्थोपेडिक या तिन्ही शाखांचे तज्ञ व मेडिकल सोशल वर्कर समन्वयाने काम करत असल्याची माहिती यावेळी मिळाली.मुलगी व तिच्या आईशी नातेवाईकांनी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी आईच्या भावनांचा बांध आवरता आला नाही व त्यांनी पुढील काळात शेजारीपाजारी, तिच्या शाळेतील मैत्रीणी, शिक्षिका काय प्रश्न विचारतील, याची काळजी वाटत असल्याचे सांगितले. आईला धीर देऊन पोलिसांशी संवाद साधून पोलीस आरोपीला पकडण्याचे प्रयत्न करत असल्याचे सांगितले. या बालिकेला पुढे शिकायचे असून इतर मुलींनी अशाच संकटातून मुलींनी आरोपीला शिक्षा दिली व त्यांचे शिक्षणही चालू असल्याची उदारहणे नीलमताईंनी सांगितली. 'काय आवडते' हे विचारल्यावर तिला खेळणी व पुस्तके आवडतात असे या मुलीने सांगितले. तिला शारीरिक त्रास होत असला तरी तिची मानसिक स्थिती सुधारत आहे. पालघरचे ग्रामीण अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री राजतीलक यांच्याशी नीलम गोऱ्हे यांनी कालपासून अनेकवेळा संवाद साधला. मुलीच्या जबाबासोबतच इतर तपासाची माहिती नीलमताईंनी घेतली. आरोपी जेवढे दिवस मोकाट राहील तेवढ्या इतर मुलींनाही धोका होऊ शक्ती म्हणून वेगाने कारवाईचा आग्रह डॉ.गोऱ्हे यांनी धरला. या मुलीची हॉस्पिटलमधून रवानगी केल्यानंतर तिच्या घरी मदत करण्याच्या सूचनाही आ.डॉ.गोऱ्हे यांनी नालासोपारा शिवसेना शहरप्रमुख श्री जितू शिंदे यांना दिल्या. याप्रकरणी श्री चेतन भागवत, सुधाकरराव नाईक एज्युकेशन ट्रस्ट मदत करणार आहेत. 

टॅग्स :शिवसेनामुंबई