Join us  

उत्तर पश्चिममध्ये मल्टी स्पेशालिटी सुसज्ज हॉस्पिटलची गरज

By मनोहर कुंभेजकर | Published: April 26, 2024 6:45 PM

मुंबई महानगर पालिकेने मल्टी स्पेशालिटी सुसज्ज हॉस्पिटल येथे सुरू करणे गरजेचे असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी लोकमतला सांगितले.

मुंबई-उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाची लोकसंख्या सुमारे 17.5 लाख आहे.या मतदार संघात जोगेश्वरी पूर्व,दिंडोशी,गोरेगाव,वर्सोवा,अंधेरी पश्चिम,अंधेरी पूर्व असे सहा विधानसभा मतदार संघ येतात.या लोकसभा क्षेत्रात विलेपार्ले पश्चिम येथील डॉ.आर.एन.कूपर हॉस्पिटल, जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर हॉस्पिटल ही प्रमुख हॉस्पिटल कार्यरत आहेत.तर गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ हॉस्पिटल 2019 पासून पुनर्निर्माण साठी बंद असल्याने रुग्णांचा जास्त भार कूपर हॉस्पिटल व बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर हॉस्पिटलवर पडतो.

या भागात कोकीळाबेन अंबानी हॉस्पिटल,नानावटी हॉस्पिटल,क्रीटी केअर हॉस्पिटल,होली स्पिरिट हॉस्पिटल,लाईफ लाईन हॉस्पिटल सारखी अनेक खाजगी हॉस्पिटल आहेत.मात्र येथील हॉस्पिटलचे दर जास्त असल्याने सामान्य व मध्यवर्गीयांना ते परवडत नाही.या भागात टाटा हॉस्पिटलच्या धर्तीवर सुसज्ज कर्क रुग्णालय उभे करण्याची पालिकेची 2000 पासूनची योजना अद्याप कागदावरच राहिली आहे. उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राची वाढती लोकसंख्या लक्षात घेता एका राज्याचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महानगर पालिकेने मल्टी स्पेशालिटी सुसज्ज हॉस्पिटल येथे सुरू करणे गरजेचे असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी लोकमतला सांगितले.

प्रतिक्रिया

विशेषतः पोस्ट कोविड नंतर हृदयरोग,किडनी आणि इतर आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.ओपन हार्ट सर्जरी,किडनी प्रत्यारोपण सारखी सुसज्ज अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पालिका रुग्णालयात तितकीशी उपलब्ध नसते.नसते.ओपन हार्ट सर्जरीला शस्त्रक्रियेला सुमारे 7-8 लाख खर्च येतो. तो सामान्य,गरीब रुग्णांना परवडणारा नाही.त्यामुळे पुढील 20-25 वर्षांचा विचार करून महापालिकेने पश्चिम उपनगरात गरिब व मध्यमवर्गीयांसाठी मल्टी स्पेशालिटी सुसज्ज हॉस्पिटल बांधणे गरजेचे आहे.

डॉ.दीपक सावंतमाजी आरोग्य मंत्री

प्रतिक्रिया

अंधेरी पूर्व,मरोळ येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबईच्या आरोग्य सुविधांसाठी अत्यंत महत्वाचे व मोक्याचे हॉस्पिटल आहे. सध्या न्यायप्रविष्ठ असलेले हे हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने पूर्ण क्षमतेने चालवले पाहिजे अशी सातत्याने मागणी केली जात आहे. अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये सध्या २४५ खाटा खाजगी व्यक्तींच्या उपचारासाठी वापरल्या जातात तर केवळ ६१ खाटा सर्वसामान्य जनतेसाठी वापरल्या जात आहेत. श्रीमंत लोकांच्या उपचारावर सबसीडी देण्याची महानगरपालिकेला काही गरज नाही, हे महापालिकेचे काम नाही. तर येथील सर्वच्या सर्व ३०६ खाटा या सर्वसामान्य जनतेसाठीच असाव्यात.२०२० पासून महानगरपालिका या हॉस्पिटलवर दर महिना ९ कोटी रुपये खर्च करते आणि उत्पन्न केवळ ५ कोटी रुपये आहे. परिणामी महापालिकेला महिन्याला ४ कोटींचा तोटा होत आहे, हा पैसा जनतेचाच आहे, त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचा विचार करता व वाढत्या वैद्यकीय उपचारांचा विचार करता पालिकेने हे हॉस्पिटल तात्काळ के.ई.म. व जे.जे. हॉस्पिटलप्रमाणे चालवण्यास घ्यावे.आणि येथे मल्टी स्पेशालिटी सुसज्ज हॉस्पिटलची सुविधा जनतेसाठी उपलब्ध करावी.

राजेश शर्मामाजी उपमहापौर व प्रदेश काँग्रेस सरचिटणीस

टॅग्स :मुंबई