'आमचंही हेलिकॉप्टर ढगात सापडलं होतं, मी पायलटला सांगितलं की...'; पवारांनी सांगितला थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 07:59 PM2021-12-08T19:59:19+5:302021-12-08T20:18:05+5:30

बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

NCP President Sharad Pawar has paid tributes After the accidental death of CDS Bipin Rawat | 'आमचंही हेलिकॉप्टर ढगात सापडलं होतं, मी पायलटला सांगितलं की...'; पवारांनी सांगितला थरारक अनुभव

'आमचंही हेलिकॉप्टर ढगात सापडलं होतं, मी पायलटला सांगितलं की...'; पवारांनी सांगितला थरारक अनुभव

googlenewsNext

मुंबई: तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला. यामध्ये भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १२ लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले आहे.  भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात CDS जनरल बिपीन रावत यांच्यासह १२ जणांचे निधन झाल्याचे म्हटले आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. हेलिकॉप्टरमधून एकूण १४ जण प्रवास करत होते. यापैकी १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. 

डीएनए चाचणीच्या मदतीनं १३ मृतदेहांची ओळख पटवली जाणार असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुपारी पाऊणच्या सुमारास तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळलं. ग्रुप कॅप्टन पी. एस. चौहान आणि स्क्वॉड्रन लीडर कुलदीप यांच्याकडे चॉपरचं सारथ्य होतं.

बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. अपघातामुळं देशाचं मोठं नुकसान झालं आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आणि दु:ख झाले. त्यांची कारकीर्द अतिशय उत्कृष्ट होती आणि गेल्या चार दशकांतील त्यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा नेहमीच स्मरणात राहील. ही घटना देशाच्या दृष्टीने अतिशय दु:खदायक, चिंताजनक आणि काळजी करणारी असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी त्यांच्यासोबत घडलेला व्यक्तीगत अनुभव देखील सांगितला. टीव्ही ९ मराठीच्या वृत्तानूसार, एक दिवस मी पुण्याहून मुंबईला हेलिकॉप्टरने निघालो होतो. त्यावेळी माझी पत्नी आणि एक राज्यमंत्री माझ्यासोबत होते. तेव्हा लोणावळा संपून खोपोलीकडे जाताना एक व्हॅली आहे. तिथे अनेकदा ढग असतात. आमचं हेलिकॉप्टर तिथून जात असताना ढगात आम्ही सापडलो, खूप वारा होता त्यामुळे ते हेलिकॉप्टर पुढे ज्यायला मर्यादा आल्या होत्या, असं शरद पवारांनी सांगितलं. 

आमचं हेलिकॉप्टर ढगात सापडल्यामुळे आजुबाजूचं काही दिसत नव्हतं. आम्ही तिथे काळजी घेतली नसती तर ते हेलिकॉप्टर व्हॅलीमध्ये कुठेतरी आदळलं असतं. पण मला साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्राची माहिती असल्यामुळेमहाराष्ट्रात कळसूबाई हे सर्वात उंच शिखर नाही. ते ५ हजार फुटाच्या वर नाही. तेव्हा मी तातडीने पायलटला सांगितलं की आपण ७ हजार फूट उंचीवर गेलो तर काही अडथळा येणार नाही. ते हेलिकॉप्टर धडकण्याची शक्यता नाही. त्यामुळे ढगांचा अडथळा पार करुन सुखरुपपणे आम्ही उतरू शकलो, असं शरद पवारांनी सांगितलं.

दरम्यान, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत हे बुधवारी दुपारी ३ वाजता हवाई दलाच्या  Mi-17VH हेलिकॉप्टरमधून नियोजित व्याख्यान देण्यासाठी कुन्नूर जिल्ह्यातील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे जात होते. हेलिकॉप्टरने सुलूर एअरबेसवरून उड्डाण केले होते आणि ते वेलिंग्टनला जात होते. यादरम्यान या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. दरम्यान, हेलिकॉप्टरच्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत.

चॉपरमध्ये कोण कोण होतं?-

बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारी होते. ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक साई तेजा आणि हवालदार सत्पाल अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये होते. 

CCS ची महत्त्वाची बैठक-

हेलिकॉप्टर दुर्घटनेवर CCS ची (केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा संबंधी समिती) ची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. दुसरीकडे, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी सांगितले की, कुन्नूर, तामिळनाडू येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती संबंधित मंत्रालय योग्य वेळी देईल.

Web Title: NCP President Sharad Pawar has paid tributes After the accidental death of CDS Bipin Rawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.