Join us  

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंती दिनी नाट्यस्मृतींचे ‘तृतीय रत्न’...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कथोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन १८५५ मध्ये ‘तृतीय रत्न’ हे नाटक लिहिले होते. पहिले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन १८५५ मध्ये ‘तृतीय रत्न’ हे नाटक लिहिले होते. पहिले स्वतंत्र सामाजिक आणि प्रायोगिक नाटक म्हणून हे नाटक ओळखले जाते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत काही रंगकर्मी व अभ्यासकांनी, संवाद व समाज माध्यमाद्वारे ‘तृतीय रत्न’ या नाटकाच्या स्मृती जागवत त्यांना अभिवादन केले आणि या निमित्ताने हे नाटक नव्याने दृगोच्चर झाले.

‘तृतीय रत्न’ या पहिल्या प्रायोगिक नाटकाचा पुण्यातील पहिला प्रयोग ११ एप्रिल २००२ रोजी म्हणजे १९ वर्षांपूर्वी आम्ही केला होता, अशी आठवण या नाटकाचे निर्माते व दिग्दर्शक स्वागत थोरात यांनी या निमित्ताने जागवली आहे. महात्मा फुलेंनी सन १८५५ मध्ये हे नाटक लिहिल्यानंतर, पुण्यात त्याचा पहिला प्रयोग १४७ वर्षांनी झाला. तोपर्यंत पुण्यातील एकाही रंगकर्मींने किंवा नाट्यसंस्थेने त्याचा प्रयोग केला नव्हता. पुण्यातील प्रयोगाआधी, २८ नोव्हेंबर २००१ रोजी या नाटकाचा आम्ही मुंबईत पहिला प्रयोग केला होता. या प्रयोगांनंतर प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही या नाटकाचे मुंबई, पुणे, नालासोपारा, धुळे आणि अहमदनगर येथे प्रयोग केले, अशा स्मृती जागवत स्वागत थोरात यांनी समाजमाध्यमांवर संवाद साधला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ‘तृतीय रत्न’ या नाट्यकृतीचा सखोल वेध घेणारे ज्येष्ठ अभ्यासक व लेखक डॉ. सतीश पावडे यांनी या नाटकावर ‘तृतीय रत्न-आद्य मराठी नाटक’ अशी साहित्यकृती आणि काही लेखही सिद्ध केले आहेत. महात्मा फुले यांची वैचारिक दृष्टी या नाटकात कलात्मकदृष्ट्या व्यक्त होते. कलेचा कृतिपूर्ण उद्देश या नाटकातून दिसून येतो. बहुजनांचा प्रश्न मांडून शिक्षणाचे महत्त्व महात्मा फुले यांनी या नाटकात अधोरेखित केले. सामाजिक परिवर्तनाचा उद्देश समोर ठेवून त्यांनी हे नाटक रचले असल्याने, महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक मराठी रंगभूमीचे जनक ठरतात, असे या नाट्यकृतीबद्दल विचार मांडताना डॉ. सतीश पावडे त्यांच्या लेखणीद्वारे स्पष्ट करतात.

सामाजिक रंगभूमीचा पाया...

नाटक म्हणजे मनोरंजन, असे सर्वसाधारणपणे म्हटले जात असले तरी महात्मा ज्योतिबा फुले यांचा काळ आणि तेव्हाचे समाजमन लक्षात घेता नाटकातून होणाऱ्या प्रबोधनाला महत्त्व होते. वैचारिक व सामाजिक दृष्टिकोनातून आणि प्रबोधनाची कास धरत समाजाच्या अंतर्मनात पोहोचण्यासाठी त्यांनी ‘तृतीय रत्न’ हे नाटक बांधले. याच नाटकाने सामाजिक रंगभूमीचा पाया रचला असे म्हटले जाते.