Join us  

नॅशनल पार्कच्या भिंतीला इंडिकाची धडक

By admin | Published: July 28, 2015 2:43 AM

दहिसर पूर्व परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर रविवारी रात्री एका इंडिका कारच्या अपघातात गाडीमध्ये बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून

मुंबई : दहिसर पूर्व परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर रविवारी रात्री एका इंडिका कारच्या अपघातात गाडीमध्ये बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे दहिसर पोलिसांनी सांगितले.शरद मधुकर नार्वेकर (२९), नितीन पांडुरंग कांबळी (३६) आणि शंकर अनंत सावंत (३०) हे तिघे रविवारी रात्री दीडच्या सुमारास इंडिका कारने बोरीवलीहून दहिसरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी दहिसर चेकनाक्याजवळील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या(नॅशनल पार्क) संरक्षक भिंतीला कार धडकली. या अपघातात तिघेही गंभीररीत्या जखमी झाले. त्यापैकी नार्वेकर, कांबळी यांचा उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. सावंत यांना उपचारार्थ कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असले तरी सावंत यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांना रुग्णालयातून मिळाली आहे. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अपघाताची नोंद घेत पुढील चौकशी व तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांच्या माहितीनुसार, तिघे कॉल सेंटरमध्ये ड्रायव्हर होते. अपघातातून वाचलेला तरुण अद्याप बेशुद्धावस्थेत आहे. तो शुद्धीवर आल्यानंतर अपघात कसा घडला, कार कोण चालवत होता, हे समजू शकेल. नार्वेकर आणि कांबळी यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी धाडल्याचेही जाधव यांनी सांगितले.