National monument of Ambedkar residence! - Chief Minister Uddhav Thackeray | आंबेडकर निवासस्थानाचे राष्ट्रीय स्मारक!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आंबेडकर निवासस्थानाचे राष्ट्रीय स्मारक!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बीआयटी चाळीतील ज्या खोलीत तब्बल २२ वर्षे वास्तव्य केले ते निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली.
परळ येथील ‘बीआयटी’ चाळीतील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक ५० आणि ५१ मध्ये डॉ. बाबासाहेबांचे वास्तव्य होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळीच या चाळीला भेट देत पाहणी केली. या वेळी
विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे
यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या
प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच बुद्धवंदना घेण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे
यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या खोल्यांमध्ये जाऊन तेथे जतन करण्यात आलेल्या वस्तू तसेच छायाचित्रांचीही माहिती घेतली.
मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांच्या वास्तव्यामुळे ही वास्तू एक महत्त्वाचे वारसास्थळ ठरली आहे. त्यामुळे ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेबांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. सामान्य माणसांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. बीआयटी चाळ येथे २२ वर्षे बाबासाहेबांचे वास्तव्य होते. ते निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईत ‘ड्राय डे’ पाळला
६ डिसेंबर रोजी ‘ड्राय डे’ घोषित करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे मुंबई अध्यक्ष जनार्दन कोंडविलकर यांनी केली होती. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी मुंबईत ‘ड्राय डे’घोषित केला होता.
राजकीय पक्षांची,
नेत्यांची बॅनरबाजी
प्रत्येक राजकीय पक्षांची
आणि नेत्यांची दादर परिसरात ठिकठिकाणी अभिवादन करण्यासाठी बॅनर लावले होते. अनेक संघटनाकडून मोफत पाणी, भोजन वाटप करण्यात येत होते.

बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारतासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज - राज्यपाल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्यपाल म्हणाले, बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे, मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, आमदार आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शुक्रवारी सकाळीच चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दादर येथील श्रीमती कमला मेहता अंधशाळेच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यानंतर उपस्थित नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. फडणवीस यांनी शिवाजी पार्क येथील भिक्खू महासंघासोबत बुद्धवंदनाही केली. या वेळी भाजप आमदार भाई गिरकर, प्रसाद लाड आदी
उपस्थित होते.

आम्ही आंबेडकरवादी
‘आपली भूमी चैत्यभूमी स्वच्छ भूमी’ या संघटनेद्वारे चैत्यभूमी परिसर स्वच्छ करण्यात येत होता.
यासह यामधील स्वयंसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे फलक हातात घेऊन उभे होते.
‘अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही.’ असे बाबासाहेबांचे विचार फलकातून मांडण्यात आले.
‘बौद्ध असल्याचा आम्हां अभिमान, चला करू स्वच्छता जाणीव अभियान’ असे ‘आपली भूमी चैत्यभूमी स्वच्छ भूमी’ या संघटनेद्वारे सांगण्यात येत होते.

भारतीय संविधान पुस्तकाची सर्वाधिक खरेदी
शिवाजी पार्क, दादर, चैत्यभूमी येथे उभारण्यात आलेल्या प्रत्येक पुस्तकांच्या स्टॉलवर भारतीय संविधान पुस्तकाची खरेदी केली जात होती. त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गौरव गाथा, मनुस्मृतीची बुद्धिवादी समीक्षा या पुस्तकांची विक्री होत होती. यासह नववर्षांची दिनदर्शिका विक्री केली जात होती.

वॉटरप्रुफ मंडपांचा अभाव
शिवाजी पार्क अनुयायींना तात्पुरत्या निवाºयासाठी मंडप उभारण्यात आली होती. मात्र हवामानातील बदलामुळे शिवाजी पार्क येथे गुरूवारी पाऊस पडला. परिणामी काही अनुयायींना चिखलातून प्रवास करावा लागला. तर, काही अनुयायी भिजले. भारतीय बौद्ध महासभेकडून वॉटप्रुफ मंडप उभारण्याचे सांगण्यात आले होते. मात्र शिवाजी पार्क येथे वॉटरप्रुफ मंडपांचा अभाव होता. पालिकेने पर्यायी व्यवस्था म्हणून पालिकेच्या शाळेत जागा तयार केली होती.

महामानवाला अभिवादन करण्यासाठी आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्यभूमी येथे आलो आहे. आमचा ५० जणांचा ग्रुप आहे. भारतीय बुद्धिस्ट असोशिएशन या संघटनेकडून आग्राहून आलो. २ डिसेंबर रोजी तेथून निघालो होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आता परतीचा प्रवास सुरू करत आहोत.
- मानसिंह गौतम, आग्रा

प्रत्येक अनुयायीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता येण्यासाठी दरवर्षी वेगवेगळे प्रयत्न करतो. अनुयायी शांततेने रांगेत उभे राहून अभिवादन करून परतीचा प्रवास करतात. देशासह राज्यभरातून आलेल्या प्रत्येक अनुयायींना मार्गदर्शन करण्यासाठी ठिकठिकाणी १० हजारांच्या संख्येने भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते तैनात केले होते. ६ हजार समता सैनिक दलाचे जवान होते.
- भिकाजी कांबळे, राष्ट्रीय सचिव, भारतीय बौद्ध महासभा

६३ वर्षांपासून लाखोंच्या संख्येने आलेल्या अनुयायींना कोणत्याही प्रकारची असुविधा मिळू नये, यासाठी प्रयत्न असतो. शिवाजी पार्क येथे अनुयायांसाठी तात्पुरत्या निवाºयाची सोय केली होती. चैत्यभूमीकडे येण्यासाठी एकूण १३ पॉईट तयार करण्यात आले होते.
- एन. एम. आगाने, राष्ट्रीय सचिव, भारतीय बौद्ध महासभा

Web Title: National monument of Ambedkar residence! - Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.