राणे कुटुंबीयांनी घेतली पवारांची भेट, रुग्णालयात जाऊन केली विचारपूस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 12:09 PM2021-03-31T12:09:29+5:302021-03-31T13:05:27+5:30

नारायण राणे हे पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह शरद पवारांची भेट घेण्यात आले होते. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नारायण राणे आणि शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत.

Narayan Rane family visited Pawar, went to the hospital and questioned him | राणे कुटुंबीयांनी घेतली पवारांची भेट, रुग्णालयात जाऊन केली विचारपूस

राणे कुटुंबीयांनी घेतली पवारांची भेट, रुग्णालयात जाऊन केली विचारपूस

googlenewsNext
ठळक मुद्देनारायण राणे आणि शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळेच, राणे महाविकास आघाडीवर, मुख्यमंत्र्यावर जहाल टीका करतात, पण मी शरद पवारांवर टीका करणार नाही, असेही ते जाहीरपणे सांगतात.

मुंबई - पोटदुखीच्या त्रासामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून ते त्यांचं रोजचं आवडतं काम करत असल्याची माहिती त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस अनेक दिग्गजांकडून करण्यात आली. आता, माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे पवारांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. (Saheb is doing what he loves the most reading his Morning Newspapers! Supriya Sule tweet Sharad Pawar Hospital Photo)  

नारायण राणे हे पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह शरद पवारांची भेट घेण्यात आले होते. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नारायण राणे आणि शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळेच, राणे महाविकास आघाडीवर, मुख्यमंत्र्यावर जहाल टीका करतात, पण मी शरद पवारांवर टीका करणार नाही, असेही ते जाहीरपणे सांगतात. नारायण राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यातही शरद पवारांची उपस्थिती होती. तर, स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेवेळेही राणेंची शरद पवार यांचा सल्ला घेतला होता. यावरुन, या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या मैत्रीपूर्ण सलोख्याचे संबंध दिसून येतात. त्यामुळेच, राणेंनी फोनवरुन चौकशी करण्याऐवजी थेट ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.  

दिग्गजांकडून विचारपूस

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फोनवर विचारपूस केल्याचे शरद पवार यांनी ट्विटरवर सांगितले होते. भारतरत्न लता मंगेशकर यांनी प्रकृतीची विचारपूस केली. या सदिच्छांबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे, असे पवार यांनी म्हटले. लवकर बरे व्हावे अशी भावना व्यक्त करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही पवार यांनी आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, निर्मला सीतारमन यांनी विचारपूस केल्याचेही पवार यांनी ट्विट करून सांगितले.

सुप्रिया सुळेंकडून फोटो शेअर

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून म्हटलंय की, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत असं सांगत त्यांनी शरद पवारांचा रुग्णालयात पेपर वाचत असतानाचा फोटो अपलोड केला आहे.
     
पश्चिम बंगाल दौरा रद्द

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पवार बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. तो कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे. केरळमध्येही पवार प्रचार दौरे करणार होते. मात्र, आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व निवडणूक प्रचार दौरे आणि नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पवार यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा दिल्या.
 

Web Title: Narayan Rane family visited Pawar, went to the hospital and questioned him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.