Join us  

नामकरण होतेय, पण जगण्याचा संघर्ष सुरूच; KEM मध्ये हात कापलेल्या बाळाच्या बापाची व्यथा

By संतोष आंधळे | Published: October 25, 2023 10:38 AM

वडिलांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, त्याचे नामकरण झाले, मात्र माझ्या मुलाच्या जगण्याचा संघर्ष आजही सुरू आहे.

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : तब्बल १२५ दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयात मुदतपूर्व जन्म झालेल्या बाळाचे वजन कमी होते. उपचारादरम्यान हाताला झालेल्या संसर्गामुळे त्याचा हात कापावा लागला होता. त्या बाळाला ११२ दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्याचे नामकरण करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या वडिलांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, त्याचे नामकरण झाले, मात्र माझ्या मुलाच्या जगण्याचा संघर्ष आजही सुरू आहे. अजूनही त्याच्या डोक्यातील पाणी होण्याच्या आजारावर उपचार सुरूच आहेत.      नालासोपारा येथे राहणारे राहुल चव्हाण यांची पत्नी अश्विनीला केईएम रुग्णालयात १९ जून रोजी मुलगा झाला. अश्विनीची प्रसूती मुदतपूर्व झाल्यामुळे त्या बाळाला उपचारासाठी नवजात शिशु दक्षता विभागात ठेवण्यात आले. त्या बाळाला उपचारादरम्यान सलाईनने औषध देण्यासाठी उजव्या हाताला सुई लावण्यात आली होती. त्या सुईचा संसर्ग होऊन त्या बाळाचा हात काळा पडला होता. त्यामुळे १२ जून रोजी त्या बाळाचा हात कापण्यात आला होता.

डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप 

या प्रकारानंतर बाळाच्या आई-वडिलांनी रुग्णालयातील डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला होता.  १२ ऑगस्ट रोजी, सर्वप्रथम लोकमतने ही ‘केईएम हॉस्पिटलच्या बेफिकिरीमुळे चिमुकल्याचा हात कापावा लागला’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती.

डॉक्टरांना क्लीन चिट 

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाने संबंधित डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञाची समिती नेमली होती. त्यानंतर या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेऊन बाळाच्या वडिलांना पाच लाख रुपयांची मदत केली. पालिकेने नेमलेल्या चौकशी समितीत मात्र डॉक्टरांची बाळाच्या हात कापण्याच्या घटनेत कुठली चूक नसल्याचा अहवाल देत त्यांना क्लिन चिट देण्यात आली.

माझ्या मुलाच्या आरोग्याचे काय करायचे ते रुग्णालयाने केले आहे. त्याला आहे त्या परिस्थितीत स्वीकारून उपचार करत आम्ही रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन आलो. आज सव्वाशे दिवस पूर्ण झाले. त्यात  दसऱ्याच्या निमित्ताने नामकरण केले. त्याचे नाव आम्ही ‘अगस्त्य’ म्हणून ठेवले आहे. बाळाच्या डोक्यात पाणी झाल्याने त्याच्या उपचाराकरिता आम्ही रुग्णालयात जात आहोत. - राहुल चव्हाण, बाळाचे वडील.

त्या बाळाच्या वडिलांना आम्ही थांबवायचा प्रयत्न केला. मी स्वत: त्यांच्याशी बोललो. सर्व उपचार आम्ही त्या बाळासाठी रुग्णालयात करत होतो. बाळाला रक्त गोठण्याचा विकार असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले आहे. त्यावरसुद्धा उपचार सुरू आहेत. - डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त.

 

टॅग्स :केईएम रुग्णालय