Join us  

उत्तरपत्रिकांवरील नावाचा रकाना होणार रद्द; नव्या सत्र परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मिळणार नवीन उत्तरपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 3:03 AM

३ एप्रिलपासून सुरूहोणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांमध्ये विद्यापीठाकडून नवीन उत्तरपत्रिका महाविद्यालयांना पुरविण्यात येणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या नावाचा रकाना काढून टाकण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून मिळाली आहे.

मुंबई : ३ एप्रिलपासून सुरूहोणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांमध्ये विद्यापीठाकडून नवीन उत्तरपत्रिका महाविद्यालयांना पुरविण्यात येणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या नावाचा रकाना काढून टाकण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून मिळाली आहे. उत्तरपत्रिकेवर विद्यार्थ्यांचे नाव लिहिण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाने गतवर्षी प्रचंड गदारोळ झाला होता.मुंबई विद्यापीठाने ओएसएम प्रणाली स्वीकारल्यानंतर त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी हिवाळी सत्रांच्या परीक्षांमध्ये छापलेल्या उत्तरपत्रिकांवर विद्यार्थ्यांचे नाव लिहिण्यासाठी रकाना ठेवण्यात आला होता. नावाच्या रकान्यामुळे उत्तरपत्रिका कोणाची आहे हे सहजपणे कळून गैरप्रकार होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसह विद्यार्थी संघटना, सिनेट सदस्यांनीही उत्तरपत्रिकेवरील नावाच्या रकान्याला विरोध केला होता. विरोध लक्षात घेता विद्यापीठाने उत्तरपत्रिकांवरील विद्यार्थ्यांच्या नावाचा रकाना रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने २०१९ च्या (उन्हाळी सत्र) उत्तरपत्रिकांवर विद्यार्थांचे नाव लिहिण्याचा रकाना प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाविद्यालयांकडून नावाचा रकाना असलेल्या जुन्या उत्तरपत्रिकाही गोळा करण्यात आल्या आहेत. तसेच यासंदर्भातील सूचना महाविद्यालयांना दिल्या आहेत.प्रस्तावाला मंजुरीउत्तरपत्रिकेवर नाव टाकल्यास परीक्षा केंद्रापासून ते उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगपर्यंतच्या मार्गात उत्तरपत्रिकेमध्ये फेरफार होऊ शकतात. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग होऊन गैरप्रकार वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे नावाचा रकाना नको, अशी मागणी विद्यार्थ्यांसह विद्यार्थी संघटनांनीही केली होती.युवासेनेने यासंदर्भात निवेदन देऊन या उत्तरपत्रिका मागे घेण्याची मागणी विद्यापीठाकडे केली होती. त्यानंतर मंडळाच्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीत उत्तरपत्रिकेवरील नावाचा रकाना काढण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ