Join us  

कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोल्हापूर विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ असे करण्यात यावे, अशी मागणी करीत खासदार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोल्हापूर विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ असे करण्यात यावे, अशी मागणी करीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नवनिर्वाचित हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली.

करवीर छत्रपती घराण्याशी ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राजर्षी शाहू छत्रपती महाराज व ग्वाल्हेरचे महाराज श्रीमंत माधवराव शिंदे हे अत्यंत जवळचे मित्र होते. ग्वाल्हेर घराण्याचे वंशज ज्योतिरादित्य शिंदे यांची नुकतीच केंद्रीय मंत्रीपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याची मागणी केली, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

२०१८ साली महाराष्ट्र शासनाने याबाबत ठराव करून प्रस्ताव दिला होता. विद्यमान राज्य शासनाने पुन्हा एकदा तसा ठराव करून नव्याने प्रस्ताव पाठविल्यास लवकरच कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देऊ, अशी ग्वाही हवाई वाहतूक मंत्र्यांनी दिली. यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

त्याचबरोबर, कोल्हापूर विमानतळाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विमानतळाच्या विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली. कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडीगची सुविधा सुरू करण्यात येणारे अडथळे जलद दूर करावेत, अशी मागणी केली. याबाबतीत नागरी उड्डाण संचालनालय (डीजीसीए), भारतीय विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर विमानतळ प्रशासन, कोल्हापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व संबंधित विभागांचे प्रमुख यांच्यासोबत बैठक घ्यावी, अशी मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अशी बैठक घेऊन सर्व विषय मार्गी लावू, असे आश्वासन ज्योतिरादित्य यांनी दिल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली.