Join us  

गुंतवणुकीच्या नावाखाली एंटरटेन्मेंट बॅण्डच्या प्रमुखासह कलाकारांना पावणेअठरा कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 1:09 AM

दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू

मुंबई : गुंतवणुकीवर १८ ते २२ टक्क्यांचा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून माहिममधील राँडनी एंटरटेन्मेंट बॅण्डच्या प्रमुखासह १० कलाकारांना १७ कोटी ७७ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार माहिममध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी माहिम पोलिसांनी संजय अग्रवालसह मयूर अग्रवालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे.माहिम परिसरात राहणारे गायक राँडनी राँकी फर्नांडिस (३७) यांचा राँडनी एंटरटेन्मेंट बॅण्ड आहे. १० कलाकार या बॅण्डमध्ये काम करतात. त्यांचे भारतासह परदेशातही गाण्याचे कार्यक्रम होतात. कार्यक्रमातून येणारे पैसे ते सोन्यात गुंतवत असत. याच दरम्यान २०१३ मध्ये त्यांची ओळख अशोक जैनसोबत झाली. जैन याने त्यांची एंटरटेन्मेंट कंपनी असल्याचे सांगितले. त्यानंतर ते या कंपनीत गुंतवणूक करू लागले. ठरल्याप्रमाणे जैन यांच्याकडून वेळोवेळी परतावा म्हणून ९ टक्के व्याजदर मिळत असल्याने त्यांचा जैन यांच्यावर विश्वास बसला. त्यांच्याकडे ये-जा वाढली. याच दरम्यान त्यांच्या कार्यालयातील मयूर अग्रवालसोबतही त्यांची ओळख झाली. त्यानंतर मयूर त्यांच्या घरी येऊन व्याजाने रक्कम देत असे. पुढे त्याच्यामार्फतच व्यवहार होऊ लागले.याचदरम्यान सप्टेंबर २०१५ मध्ये मयूरने त्यांना मामा संजय अग्रवालकडे गुंतवणूक केल्यास ते १८ ते २२ टक्के व्याजदर देतील असे आमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी आॅक्टोबर २०१५ ते फेब्रुवारी २०१८ पर्यंत १५ कोटी ६२ लाख रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीच्या काळात त्यांना ठरलेल्या व्याजदराने पैसे मिळत गेले. ते पाहून बॅण्डमधील कलाकारांनीही यात गुंतवणूक केली. यामध्ये त्यांनी एकूण २ कोटी १५ लाख रुपये गुंतविले होते.मात्र, नोव्हेंबर २०१६ पासून अग्रवालकडून नियमित व्याज येणे बंद झाले. त्यानंतर २०१७ मध्ये त्याने व्याज देणेच बंद केले. त्याच्याकडे याबाबत पाठपुरावा करताच, ते पैसे संजयकडे दिल्याचे सांगून त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सर्वांनी संजयकडे धाव घेतली. तेव्हा सुरतमध्ये खरेदी केलेल्या जमिनीत ८ कोटींची गुंतवणूक केली असून त्यातील प्रकल्प मार्गी लागताच, पैसे परत देण्याचे आश्वासन संजयने दिले. तर उर्वरित रक्कम मयूर अग्रवालने अन्य ठिकाणी गुंतविल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतरही दोन वर्षे उलटत आली तरी पैसे न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले....त्यानंतर घेतली पोलिसांत धावदोन वर्षे उलटत आली तरी पैसे न मिळाल्याने राँडनी यांना संशय आला. त्यांनी अग्रवालबाबत अधिक माहिती मिळविली असता, त्याच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे राँडनी यांनीही माहिम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

टॅग्स :धोकेबाजी