Join us  

डोंबिवलीतील नागुबाई निवास इमारत खचली दिवस पाचवा : घर तर नाहीच मिळाले पण संसार तर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:38 PM

आधी आम्हाला आमच्या घरातले सामान द्या, त्या शिवाय इमारत पाडता येणार नाही. असे म्हणत नागुबाई निवासच्या रहिवाश्यांनी मंगळवारी अचानकपणे इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाला शांत करतांना विष्णुनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांसह महापालिकेच्या आपात्कालीन विभागातील कर्मचा-यांच्या तोंडचे पाणी पळाले.

ठळक मुद्दे नागुबाई निवासचे रहिवासी संतप्ततो पर्यंत इमारत पाडु देणार नाही

डोंबिवली: आधी आम्हाला आमच्या घरातले सामान द्या, त्या शिवाय इमारत पाडता येणार नाही. असे म्हणत नागुबाई निवासच्या रहिवाश्यांनी मंगळवारी अचानकपणे इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाला शांत करतांना विष्णुनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांसह महापालिकेच्या आपात्कालीन विभागातील कर्मचा-यांच्या तोंडचे पाणी पळाले.सोमवारी रात्री एक पोकलेन आणत महापालिकेच्या अधिका-यांनी काही मजल्यांवरील गॅलरिच्या भिंती पाडल्या. त्यानंतर मंगळवारी सकाळी आणखी एक पोकलेन आणला, चार तासात इमारत पाडणार अशी अधिकारी-कर्मचा-यांची झालेली चर्चा कानावर येताच रहिवासी एकवटले. त्यांनी त्रागा करत इमारतीच्या दिशेने धाव घेतली, सकाळी दोन महिला चौथ्या मजल्यावर कशाबशा पोहोचल्या. पोलिस यंत्रणेची नजर चुकवून त्या गेल्याच कशा यावरुन घटनास्थळी तणाव झाला. त्यांना कसेबसे खाली आणण्यात आले. त्यानंतर पोकलेनने इमारत तुटणार या भावनेने महिला रहिवाश्यांनी आमचा संसार आधी आमच्या ताब्यात द्या. पंखे, दिवाण, कपाट, यासह शोकेस, स्वयंपाक घरातील सामान, टिव्ही संच यासह अन्य शैक्षणिक साहित्य आम्हाला मिळवून द्या या भावनेने रहिवाश्यांनी संताप व्यक्त केला. सामान नाही मिळत तोपर्यंत इमारत पाडू देणार नाही असा पवित्रा घेतल्याने महापालिकेच्या कामात अडथळे आले. ह प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांनीही रहिवाश्यांना सामान काढणे शक्य नाही, इमारत कधीही कोसळेल असे सांगितले. पण तरीही रहिवाश्यांनी त्यांचे काहीही न ऐकता इमारतीच्या दिशेने धाव घेतली. वातावरण तंग झाल्याचे लक्षात आल्यावर मात्र महापालिकेने सावध पवित्रा घेत काही काळ काम थांबवले. आधीच तात्ुपरत्या निवाराचा पत्ता नसतांना आता आमच्या घरातील संसाराचे काय होणार? ३०, ३५ वर्षे उभा केलेला संसार उभ्या डोळयादेखत कसा मोडणार असा सवाल महिलांनी केला.

 

टॅग्स :ठाणेडोंबिवली