Join us  

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ : महापालिकेने केली एक कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 11:57 AM

राज्यस्तरावर राबविण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत मुंबईतील घराघरातील प्रत्येक व्यक्तीची प्राणवायू पातळी व तापमान तपासणी, गंभीर आजार असलेल्या लोकांची माहिती घेण्यात आली. आता १५ ते २५ ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. (Coronavirus)

मुंबई : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत घरोघरी सर्वेक्षण करणाऱ्या स्वयंसेवकांना काही ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागला. काही उत्तुंग इमारतींमधील रहिवाशांनी प्रवेश नाकारला. तर नागरिक बाहेरगावी असल्याने सर्वेक्षण होऊ शकले नाहीत. सर्वेक्षणातून सुटलेल्या अशा लोकांसाठी दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. तर पहिल्या टप्प्यात ३३ लाखांपेक्षा अधिक घरांतील एक कोटी व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

राज्यस्तरावर राबविण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत मुंबईतील घराघरातील प्रत्येक व्यक्तीची प्राणवायू पातळी व तापमान तपासणी, गंभीर आजार असलेल्या लोकांची माहिती घेण्यात आली. आता १५ ते २५ ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र पहिल्या टप्प्यात काही ठिकाणी इमारतींमधील रहिवाशांनी असहकार्य केल्यामुळे आता स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेतली जात आहे. तसेच स्वयंसेवकांना सहकार्य करीत सर्व माहिती द्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. 

दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात काय? -प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घेतली जात आहे. यामध्ये वय, लिंग यासह मधुमेह, रक्तदाब यांसारख्या सहव्याधींची माहिती घेण्यासह कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान व प्राणवायू पातळीसुद्धा नोंदवून घेण्यात येत आहे. तसेच पूर्ण प्रतिबंध घालण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती पुन्हा एकदा दिली जात आहे. स्वयंसेवकांचा प्रत्येक चमू दररोज ७५ ते १०० कुटुंबीयांचे सर्वेक्षण करीत आहे. 

सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींची नोंद -मधुमेह, हृदयविकार, दम्याचा त्रास अशा गंभीर सहव्याधी असलेल्या लोकांची स्वतंत्र नोंद घेतली जात आहे. यापैकी कोविडची लक्षणे असलेल्या व्यक्तीला महापालिकेच्या दवाखान्यात अथवा रुग्णालयात पुढील आवश्यक त्या तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईमुंबई महानगरपालिका