Join us  

मुशीर खानवर तीन वर्षांची बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:45 AM

एमसीएने गैरवर्तणुकीमुळे केली कारवाई

मुंबई : मुंबईच्या १६ वर्षांखालील क्रिकेट संघाचा कर्णधार मुशीर खान याच्यावर गैरवर्तणुकीच्या कारणामुळे मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) तीन वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. विजय मर्चंट चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान मुशीर खानने गैरवर्तण केल्याने एमसीएने कडक कारवाई केली.

डिसेंबर २०१८ मध्ये विजय मर्चंट चषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामना मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यामध्ये रंगला होता. यावेळी मुंबईचा कर्णधार मुशीर खान याने केलेल्या आक्षेपहार्य वर्तणुकीची प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी तक्रार केली होती. या प्रकरणी झालेल्या पूर्ण चौकशीनंतर एमसीएने त्याच्यावर तीन वर्षांच्या बंदीची कारवाई केली. ही बंदी त्याच्यावर १५ जानेवारी २०१९ ते १४ जानेवारी २०२२ पर्यंत असेल. एमसीएने याविषयी मुशीरला पत्राद्वारे कळविले आहे. या बंदीमुळे आता मुशीर एमसीए आणि बीसीसीआयच्या कोणत्याही स्पर्धेत पुढील तीन वर्षांसाठी खेळू शकणार नाही.

या प्रकरणाचा एक अहवाल संघ व्यवस्थापनाने एमसीएकडे सादर केला होता. यानंतर हंगामी कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये तक्रारदार, दोन संघसहकारी, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि निवड समिती अध्यक्ष यांनाही बोलाविण्यात आले होते. यावेळी मुशीरची बाजूही ऐकण्यात आली. २१ डिसेंबरला मुशीरने आपल्यावरील आरोप स्विकारले असल्याचे पत्र एमसीएला पाठविले. त्यामुळे तक्रारदाराची लेखी तक्रार, मुशीरने आरोप कबुल केल्याचे पत्र आणि व्यवस्थापकांचे पत्र यावरुन एमसीएने ही कारवाई केली.

‘कर्णधार म्हणून जबाबदारीने वागण्यात तू अपयशी ठरला. तुझ्या वर्तनामुळे मुंबई क्रिकेट संघटनेची प्रतिमा मलिन झाली. तसेच संघालाही यामुळे धक्का बसला आणि त्यांच्यावर याचा परिणामही झाला. त्यामुळे पुढील तीन वर्षांसाठी एमसीए स्पर्धा आणि बीसीसीआयच्या कोणत्याही स्पर्धेत तुला मुंबईचे प्रतिनिधित्त्व करता येणार नाही,’ असे एमसीएने मुशीरला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.