Join us  

देवनार डम्पिंग ग्राउंडसाठी पालिकेला हवी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:40 AM

उच्च न्यायालयात अर्ज : प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे प्रशासनाला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंड बंद करून ११ वर्षांहून अधिक वर्षे उलटली तरी त्याला पर्यायी जागा उपलब्ध न झाल्याने या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ मिळविण्यासाठी मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. आतापर्यंत कचरा कमी करण्यासाठी व पर्यायी जागा मिळविण्यासाठी काय काय प्रयत्न केलेत, असा सवाल करत न्यायालयाने महापालिकेला यासंदर्भात प्रतिज्ञापत्राद्वारे माहितीे सादर करण्याचे निर्देश दिले.देवानर डम्पिंग ग्राउंडवर क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकण्यात आल्याने हे ग्राउंड बंद करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले. मात्र, मुंबईतील कचºयाचा ताण एकट्या कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर पडल्याने न्यायालयाने पालिकेला दरदिवशी ६०० मेट्रिक टनच्या आसपास कचºयाची विल्हेवाट देवनार डम्पिंग ग्राउंडवर लावण्याची मुभा दिली. त्याचवेळी या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करण्याचे व डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा शोधण्याचे आदेश पालिकेला दिले.गेली ११ वर्षे पालिका न्यायालयाकडून देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यासाठी मुदतवाढ मागून घेत आहे. दरवर्षी ही मुदत ३१ डिसेंबर रोजी संपते. मुंबईतील कचºयाचे प्रमाण वाढत असल्याने न्यायालयही मुदतवाढ देत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने मुदतवाढीसाठी न्यायालयात अर्ज केला.महापालिका देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचºयापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्प राबविणार असून नोव्हेंबर २०२२ मध्ये पहिला प्रकल्प उभा राहील व त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये दुसरा प्रकल्प उभा राहील, असे महापालिकेने अर्जात म्हटले आहे.२०१६ पासून मुंबईत कचºयाची निर्मिती कमी होत असल्याचा दावाही महापालिकेने केला. ‘वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याचे आवाहन केले. लोकांच्या वृत्तीत थोडा बदल झाला आहे. परिणामी कचरा जिथून निर्माण होतो, त्याच ठिकाणाहून ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येतो. २०१५ पर्यंत डम्पिंग ग्राउंडवर दरदिवशी ८,५०० मेट्रिक टन घनकचरा येत होता. मात्र, २०१९ मध्ये याचे प्रमाण ६८०१.४६ मेट्रिक टन इतके झाले आहे. लोकांच्या वृत्तीत एकदम बदल होणार नाही. मात्र, त्याबाबत जागरूक करण्यासाठी महापालिका आणखी प्रयत्न करेल, असे महापालिकेने अर्जात म्हटले आहे.दरम्यान, महापालिकेने आतापर्यंत कचºयाचे प्रमाण कमी करण्यासाठी काय काय पावले उचलली, असा सवाल करत न्यायालयाने महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येईलदेवनार डम्पिंग ग्राउंडवर मुंबईतील रस्त्यांवरच्या कचºयाची विल्हेवाट लावण्यात येते. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड बंद केले तर मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा होईल. मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येईल, असे महापालिकेने अर्जात म्हटले आहे.