Join us  

पालिका ठेकेदारावर निष्काळजीपणाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 6:00 AM

नालेसफाईची डेडलाइन उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यांच्याच निष्काळजीपणामुळे ट्रॉम्बेच्या अदिहान तांबोळी या तीन वर्षीय चिमुरड्याचा बळी गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या चौकशीत उघड झाली.

मुंबई - नालेसफाईची डेडलाइन उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यांच्याच निष्काळजीपणामुळे ट्रॉम्बेच्या अदिहान तांबोळी या तीन वर्षीय चिमुरड्याचा बळी गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या चौकशीत उघड झाली. त्यानुसार, ट्रॉम्बे पोलिसांनी पालिकेचा संबंधित अधिकारी व विधी एंटरप्रायझेसच्या ठेकेदारावर शनिवारी गुन्हा दाखल केला. त्यांना अदिहानच्या मृत्यूस जबाबदार धरले आहे.चित्ता कॅम्प परिसरात अदिहान हा कुटुंबीयांसोबत राहायचा. गुरुवारी दुपारी तो घराबाहेर खेळत होता. त्याच दरम्यान, एम. जे. रोड येथील दीड ते दोन फूट रुंदीच्या नाल्यात पडला. पावसामुळे नाला भरला होता. परवेज पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याला बाहेर काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अपघाती मत्यूची नोंद करत ट्रॉम्बे पोलिसांनी तपास सुरू केला, तर कुटुंबीयांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली होती.त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा तपासात, एम. जी. रोड येथील गटाराची साफसफाई करण्याची जबाबदारी विधी एंटरप्रायझेसवर सोपविण्यात आली होती. मात्र, त्यात त्यांनी निष्काळजीपणा केल्याचे दिसून आले. त्यामुळेच गटार तुंबून पाण्याच्या प्रवाहाच्या दबावाने चेंबरचे झाकण निघून गेले आणि याच उघड्या चेंबरमध्ये पडून अदिहानचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी पालिकेच्या संबंधित अधिकारी तसेच त्यांच्या विधी एंटरप्रायझेसच्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अदिहानच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार धरले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गावकर यांनी दिली.

टॅग्स :मुंबईबातम्या