Join us  

पालिका रस्ते अभियंत्याचे अवैध कोचिंग क्लासेस, लाटली कोट्यवधीची संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 4:23 AM

पालिकेचा रस्ते अभियंता उपेंद्र कुडवा याने स्वत:च्या पदाचा गैरवापर करत एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालविल्याचा गंभीर आरोप करणारा अहवाल महापालिकेने लोकायुक्तांकडे सादर केला आहे.

मुंबई : पालिकेचा रस्ते अभियंता उपेंद्र कुडवा याने स्वत:च्या पदाचा गैरवापर करत एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालविल्याचा गंभीर आरोप करणारा अहवाल महापालिकेने लोकायुक्तांकडे सादर केला आहे. तसेच त्यांची ज्ञात मालमत्ता ही अधिक असल्याचे पत्र लाचलुचपत विभागाने दिले असल्याचा खुलासा या अहवालात केला आहे.महापालिकेच्या रस्ते विभागात कार्यरत असलेला सहायक अभियंता उपेंद्र कुडवा कार्यालयीन वेळेत अंधेरी येथील घरात अभियांत्रिकी वर्गाच्या खाजगी शिकवण्या घेत असल्याची तक्रार पालिका प्रशासनाकडे आली होती. सोसायटीनेही हे क्लासेस येथून हलविण्याचे बरेच प्रयत्न केले होते. तसेच आॅक्टोबर महिन्यात स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर यांनी कुडवा हा आपल्या ताकदीचा गैरवापर करीत असल्याकडे लक्ष वेधले होते.पालिकेचे मुख्य चौकशी अधिकारी राजेंद्र रेलेकर यांनी याबाबत चौकशी अहवाल तयार केला आहे. तसेच मुंबईत १५ कोटींचे ९ फ्लॅट त्याच्या मालकीचे असून त्याने सेवा नियमांचा भंग करून बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्याविरुद्ध कारवाई होऊ नये म्हणून त्याने पदाचा दुरुपयोग केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले. याबाबतचा अहवाल लोकायुक्तांकडे सादर केला आहे.मुळात कुडवाने त्याच्या संपत्तीबाबत कोणतीही माहिती पालिकेकडे उघड केली नव्हती. एसीबीने याबाबत माहिती पालिकेला कळविल्यानंतर ही बाब उजेडात आली. अहवालात आणखीही काही अधिकाºयांची नावे आहेत.तसेच कुडवाने तीन मजली इमारतीत त्याचे कोचिंग सेंटर, व्हॅल्यू ट्युटोरियल्स अशा घरांचे बांधकाम एका निवासी संकुलातून व्यावसायिक कॉम्पलेक्समध्ये बदलले. याबाबतचा अहवाल रेलकर यांनी लोकायुक्तांकडे सादर केला. एसीबीकडूनही याबाबत चौकशी सुरू आहे. त्याच्याकडील बेहिशोबी मालमत्तेची चौकशी होऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करेल. मात्र पालिकेच्या सेवा नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना बडतर्फ करणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर अशा कोणत्याच हालचाली सुरू झालेल्या नाहीत, असे सूत्रांकडून समजते. याबाबत आयुक्त अजय मेहता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.उपेंद्र कुडवा याची खाजगी शिकवणी गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. त्यांची पत्नी व ते आठवड्यातून चार दिवस येथे शिकवतात. मात्र हे क्लासेस आपली आई चालवित असल्याचा बनाव त्यांनी केला होता. मात्र ते पालिकेच्या रस्ते विभागात सहायक अभियंता पदावर असल्याचे दोन वर्षांपूर्वी उघड झाले. त्यानंतर त्यांची तक्रार होऊन चौकशी सुरू झाली. आॅगस्टमध्ये लोकायुक्तांनीच या खाजगी शिकवण्या बंद करण्याची नोटीस पाठविली होती. निवासी क्षेत्राचा गैरवापर करणाºया कुडवा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असा इशारा लोकायुक्तांनी दिला होता.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका