Join us  

सीएसएमटी भुयारी मार्गातील दुकानदारांना पालिकेची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 4:13 AM

रेल्वेमधील भुयारी मार्गात थाटलेल्या दुकानांनी मोकळी जागाही काबीज केली आहे. यामुळे प्रवाशी व पादचाऱ्यांना या भुयारी मागार्तून ये-जा करणे त्रासदायक ठरत आहे. काही दुकानांपुढे अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे.

मुंबई : रेल्वेमधील भुयारी मार्गात थाटलेल्या दुकानांनी मोकळी जागाही काबीज केली आहे. यामुळे प्रवाशी व पादचाऱ्यांना या भुयारी मागार्तून ये-जा करणे त्रासदायक ठरत आहे. काही दुकानांपुढे अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे. खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आणि रेल्वे प्रवाशांची ट्रेन पकडण्यासाठी धावपळ, यामुळे चेंगराचेंगरीची शक्यता नाकारता येत नाही. या कारणास्तव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) भुयारी मार्गातील सर्व दुकानदारांना महापालिकेने नोटीस पाठवून ही जागा मोकळी करण्याची ताकीद दिली आहे.एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली. मात्र, काही दिवसांनी फेरीवाले पुन्हा त्या ठिकाणी परतत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी महापालिकेने भुयारी मार्गांवरही लक्ष केंद्रित केले आहे. सीएसटी परिसरात शासकीय व खासगी कार्यालय असल्याने हा भुयारी मार्ग कायम गजबजलेला असतो. या भुयारी मार्गात अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून, इलेक्ट्रॉनिक वस्तू व खेळण्यांची विक्री सुरू केली आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर महापालिकेने येथील दुकानदारांना नोटीस पाठवून मार्ग मोकळा करण्याची ताकीद दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रेल्वे परिसरात दीडशे मीटरपर्यंत फेरीवाल्यांना मनाई आहे. या भुयारी मार्गातील सीसीटीव्हीमध्ये होत असलेल्या चित्रीकरणाच्या आधारे फेरीवाल्यांवर नजर ठेवून कारवाई करणे शक्य होईल.

टॅग्स :मुंबई