ठाणे : शहराची केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या यादीत निवड झाली आहे. यासाठी पालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केला असून प्रत्येकाला हक्काचे घर, घनकचरा व्यवस्थापन, २४ तास पाणीपुरवठा, पार्किंग, रस्ते, परिवहन, आरोग्य, शिक्षण, वीज या समस्या सोडवितानाच जेएनएनयूआरएममध्ये अडकलेल्या वॉटर फ्रंट, पूर्वेचा सॅटीस प्रकल्प, मुंब्रा, दिवा आणि घोडबंदरसाठी सिव्हरेज, पाण्याच्या रिमॉडेलिंगची योजना मार्गी लावण्याचा मानस पालिकेने व्यक्त केला आहे. यानुसार, पुढील पाच वर्षांत केंद्राच्या या योजनेचा लाभ घेऊन शहराला सर्वच बाबतीत स्मार्ट करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासंदर्भातील अॅक्शन प्लॅन पालिकेने राज्य शासनालाही सादर केला असून शहर कसे स्मार्ट करणार, याचे प्लॅनिंग त्यात आहे. स्मार्ट सिटी अभियानाकरिता केंद्र शासनाकडून निवडलेल्या प्रत्येक शहराला प्रतिवर्षी १०० कोटींचे अनुदान मिळणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेने ५० टक्के इतकी रक्कम स्वत: भरावयाची आहे. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला स्मार्ट सिटी अभियानांतर्गत ५ वर्षांच्या कालावधीकरिता दरवर्षी ५० कोटी इतका निधी खर्च करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)पार्किंग : शहरात आजघडीला सुमारे १५ लाखांच्या आसपास वाहने असून दरवर्षी वाहने वाढण्याची संख्या ही ८ ते १० टक्के असून पार्किंगची सुविधा नसल्याने शहरातील बहुतेक भागांत वाहतूककोंडी होत आहे. ती सोडविण्यासाठी शहरात विविध ठिकाणी बहुमजली पार्किंग प्लाझा, आरक्षित भूखंडांवर पार्किंगची सेवा आणि भुयारी पार्किंगचाही प्रस्ताव आहे. ई-गव्हर्नन्स : या पद्धतीचा अवलंब करण्यास पालिकेने सुरुवात केली असून मालमत्ता कर आॅनलाइन भरणे, पालिकेच्या वेबसाइटवर नागरिकांना साध्या पद्धतीने तक्रार करण्यावर भर, विविध स्वरूपाचे अॅप्स तयार करण्यावर भर दिला जात आहे. या माध्यमातून संपूर्ण महापालिकेचा कारभार आॅनलाइन करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.घनकचरा व्यवस्थापन : शहरात रोज निर्माण होणाऱ्या ६५० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी, त्यानुसार शहरातील सोसायट्यांकडून ओला आणि सुका कचरा वेगळा करमन तो शीळ येथील डम्पिंगवर टाकला जाऊन त्या ठिकाणी खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तळोजा येथील सामायिक भरावभूमीत सहभागी होण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून डायघर येथेही कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.प्रत्येकाला घरठाणे शहराची लोकसंख्या १८.४१ लाख असून यात झोपडीत राहणाऱ्यांची संख्या ९.८३ लाख असून २५२ झोपडपट्ट्या आहेत. २०३१ पर्यंत ही लोकसंख्या ३४ लाखांच्या आसपास जाणार असल्याने त्यानुसार पालिकेने आताच प्लॅनिंग केले आहे. त्यानुसार, शहराला आजघडीला २ लाख १९ हजार २०० घरांची आवश्यकता असून शहराला झोपडपट्टीमुक्त करण्याचा मानस आहे. केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजना-हाऊसिंग फॉर आॅल यातून प्रत्येकाला हक्काचे घर देतानाच पाणीपुरवठा, शौचालय, अखंड वीजपुरवठा आणि इतर सुविधांसह पक्की घरे बांधण्यात येणार आहेत.शैक्षणिक सुविधा :स्मार्ट सिटीबरोबरच ठाणेकरांनाही स्मार्ट बनविण्याची तयारी पालिकेने केली असून त्याची सुरुवात महापालिका शाळांबरोबर खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून करणार आहे. विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटीचे धडे दिले जाणार असून महापालिकेच्या शाळांमध्ये ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना हायटेक करण्याचा प्रयत्न पालिकेचा आहे.जेएनएनयूआरएममध्ये अडकलेल्या प्रकल्पांचे सुधारित आराखडे तयार करणार...जेएनएनयूआरएममध्ये अडकलेली सिव्हरेज आणि आयएनडीपीची ५० टक्क्यांची कामे अद्यापही शहरात शिल्लक आहेत. तसेच वॉटर फ्रंट प्रकल्पातील ३ हजार कोटींच्या प्रकल्पातील ३५० कोटींच्या पहिल्या टप्प्यातील योजना, याशिवाय पालिकेने घोडबंदर आणि मुंब्रा, दिवा येथील पाणीसमस्या आणि सिव्हरेज लाइन टाकण्यासंदर्भातील सुमारे ६५० कोटींचा रिमॉडेलिंगचा जम्बो प्लॅन हाती घेतला होता. तसेच ठाणे पूर्वेकडील सॅटीस हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पसुद्धा आता या माध्यमातून मार्गी लावला जाण्याची शक्यता असून त्यानुसार पालिकेने सुधारित आराखडे तयार केले आहे.२४ तास पाणीपुरवठा : शहराला आजघडीला ४२० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असून गळतीचे प्रमाण ४५ टक्क्यांच्या आसपास असून पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने अनेक भागांना आजही पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे भविष्यात ठाणेकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी प्रत्येक कनेक्शनवर मीटर बसविणे, गळती कमी करणे आणि शाई धरणासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. जलकुंभ उभारणे, जलवाहिनी टाकणे, उपलब्ध जलस्रोतांच्या वापरावर भर दिला जाईल.
स्मार्ट ठाण्यासाठी महापालिकेचा अॅक्शन प्लॅन
By admin | Updated: August 1, 2015 23:45 IST