Join us  

हागणदारीमुक्त मुंबईसाठी ‘बायोटॉयलेट’ची मदत, महापालिकेने घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 3:45 AM

मुंबई हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने गेल्या वर्षी अर्थसंकल्पातून केला. या अंतर्गत घरोघरी शौचालय बांधण्यासाठीही प्रोत्साहन देण्यात येत आहे. सार्वजनिक शौचालय बांधण्याचे कामही पालिकेने मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहे.

मुंबई : मुंबई हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने गेल्या वर्षी अर्थसंकल्पातून केला. या अंतर्गत घरोघरी शौचालय बांधण्यासाठीही प्रोत्साहन देण्यात येत आहे. सार्वजनिक शौचालय बांधण्याचे कामही पालिकेने मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहे. मात्र, मुंबईत अनेक ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या टाकलेल्या नाहीत. अशा भागांमध्ये शौचालय उभारणीच्या कामाला फटका बसला आहे. यावर तोडगा म्हणून मलवाहिनी नसलेल्या ठिकाणी बायोटॉयलेट बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे शौचालय अभावी गैरसोय होणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.गेल्या वर्षभरात अनेक उपक्रम व कारवाईच्या माध्यमातून मुंबई हागणदारीमुक्त मोहीम पालिकेने राबवली आहे. मात्र, मुंबईत काही ठिकाणी मलवाहिनींचे जाळेच नसल्याने मुंबईकरांना त्याचा फटका बसतो आहे. त्यामुळे मालवाहिन्या नसलेल्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणीही बायोटॉयलेट बांधण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका वैशाली शेवाळे यांनी अर्थसंकल्पीय भाषणातून केली होती.या मागणीची आयुक्त अजय मेहता यांनी दखल घेतली आहे. मलनिस्सारण वाहिनी टाकता येत नसेल, अशा ठिकाणी बायोटॉयलेट बांधण्याची परवानगी यापुढे देण्यात येईल, असे त्यांनी अर्थसंकल्पीय निवेदनातून स्पष्ट केले. दरम्यान, लवकरच मरिन ड्राइव्ह येथे बायोटॉयलेटची उभारणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत ५ हजार २०० शौचकुपींपैकी साडेतीन हजार शौचकुपी बांधून तयार झाली आहेत, तर पुढच्या टप्प्यात २२ हजार २९२ शौचकुपी बांधण्यात येणार आहेत.

टॅग्स :मुंबई