Join us

पालिकेने वृद्धाश्रमाची योजना गुंडाळली

By admin | Updated: April 17, 2015 22:48 IST

महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक वर्षी महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली जाते.

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक वर्षी महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली जाते. वर्ष संपले की जुन्या योजना गुंडाळल्या जातात व नागरिकांना खूश करण्यासाठी नवीन योजनांची घोषणा केली जाते. चार वर्षांपूर्वी पालिकेने वृद्धाश्रम सुरू करण्यासाठी चार कोटींची तरतूद केली. परंतु, राजकीय इच्छाशक्तीअभावी ही योजनाही कागदावरच राहिली आहे. देशात सर्वत्र ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या वाढत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र धोरण निश्चित केले आहे. राज्य शासनाचे धोरण कागदावरच आहे. परंतु त्यांच्या समस्या फक्त केंद्र व राज्यापुरत्या मर्यादित नाहीत. महानगरपालिकांनीही यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य, प्रवास व इतर सुविधांमध्ये सूट मिळणे आवश्यक आहेत. परंतु त्याहीपेक्षा निराधार ज्येष्ठांसाठी मोफत वृद्धाश्रमांची खूपच गरज आहे. नवी मुंबई व परिसरात अनेक वृद्धाश्रम आहेत. परंतु तळोजामधील परमशांती धाम वृद्धाश्रम वगळता इतर ठिकाणी निराधारांचा मोफत सांभाळ केला जात नाही. यामुळे ज्या जेष्ठ नागरिकांकडे पैसे नाहीत व सांभाळ करणारे कोणीही नातलग नाहीत त्यांनी रहायचे कुठे व जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. महानगरपालिकेने यासाठी काहीतरी प्रयत्न करावे अशी मागणी होऊ लागली होती. पालिकेनेही शहरात वृद्धाश्रम सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी २०१२ - १३ च्या अर्थसंकल्पामध्ये चार कोटी रुपयांची तरतूदही केली होती. सर्वच लोकप्रतिनिधींनी या संकल्पनेचे स्वागत केले होते. लवकरच त्याची कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा केली होती. परंतु वर्ष संपले तरी प्रशासनाने काहीच केले नाही. वर्ष संपल्यानंतर पुन्हा नवीन घोषणा करून वृद्धाश्रमाला बगल दिली आहे.सरकार दरबारी ज्येष्ठांची उपेक्षानवी मुंबई महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विभागनिहाय विरंगुळा केंद्रे सुरू केली आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार सुरू केले आहेत. एनएमएमटीमध्ये तिकिटात सूट दिली आहे. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येतो. देशातील सर्वांत चांगले ज्येष्ठ नागरिक धोरण आपल्या शहरात आहे.या सर्व योजनांबरोबर काळाची गरज ओळखून वृद्धाश्रम सुरू करणे आवश्यक आहे. निराधारांना आयुष्याची सायंकाळ कमी त्रासामध्ये घालविण्यासाठी मोफत सेवा देणारे केंद्र सुरू झाले तर त्याचा लाभ अनेक नागरिकांना होऊ शकतो. परंतु, रस्ते, गटारे, पदपथ व इतर कामे करण्यात मग्न असणारे प्रशासन व नगरसेवकांना ज्येष्ठांच्या या समस्येची दखल घेण्यास वेळच मिळत नाही हे दुर्दैव. ज्येष्ठांच्या चळवळीचे केंद्र : देशभरातील ज्येष्ठ नागरिक हक्कासाठी संघर्ष करू लागले आहेत. विविध समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. ज्येष्ठांच्या या लढ्याला आता चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असून त्याचे केंद्र नवी मुंबईत आहे. नेरूळमधील ज्येष्ठ नागरिक भवन हे अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचा केंद्रबिंदू बनला आहे.