मुंबईच्या काम्याने केला गिर्यारोहणाचा नवा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 06:30 AM2020-02-10T06:30:44+5:302020-02-10T06:30:57+5:30

वयाच्या १२व्या वर्षी पराक्रम : दक्षिण अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखरावर फडकविला तिरंगा

Mumbai's Kamya set new record for climbing | मुंबईच्या काम्याने केला गिर्यारोहणाचा नवा विक्रम

मुंबईच्या काम्याने केला गिर्यारोहणाचा नवा विक्रम

Next

मुंबई : काम्या कार्तिकेयन या मुंबईतील १२ वर्षांच्या विद्यार्थिनीने अर्जेंटिनामधील अ‍ॅण्डिच पर्वतराजीतील अ‍ॅकॉन्ग्वा हे सर्वोच्च शिखर सर करून या शिखरावर यशस्वी चढाई करणारी जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक होण्याचा विक्रम केला. ६,९६२ मीटर उंचीचे अ‍ॅकॉन्ग्वा शिखर हे दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे.


काम्या भारतीय नौदलातर्फे चालविल्या जाणाऱ्या नेव्ही चिड्रेन स्कूलची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी आहे. तिने अ‍ॅकॉन्ग्वा शिखरावर १ फेब्रुवारीला तिरंगा ध्वज फडकविल्याचे संरक्षण दलांच्या जनसंपर्क अधिकाºयाने रविवारी सांगितले. काम्याचे वडील एस. कार्तिकेयन भारतीय नौदलात कमांडर, तर आई लावण्या पूर्व प्राथमिक शिक्षिका आहे. नौदल प्रवक्त्याने सांगितले की, नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस अ‍ॅडमिरल अजित कुमार यांनी काम्याचा सत्कार करताना तिची जिद्द व आत्मविश्वासाचे कौतुक केले. काम्याचे हे यश संपूर्ण नौदल परिवारासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगून अ‍ॅडमिरल अजित कुमार यांनी तिच्या भविष्यातील सर्व साहसी उपक्रमांना नौदलाचे संपूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन दिले.


काम्याचे वडील स्वत: अनुभवी व पट्टीचे गिर्यारोहक आहेत. हिमालयातील खडतर गिर्यारोहणाच्या सुरस व साहसी कथा ऐकून तिनेही गिर्यारोहणाची स्फूर्ती घेतली. वडिलांच्याच मार्गदर्शनाखाली तिने गिर्यारोहणाचे प्राथमिक धडे गिरविले.


साहसवीरांचा ग्रँड स्लॅम : पुढील वर्षी २०२१ मध्ये ‘साहसवीरांचा ग्रँड स्लॅम’ पूर्ण करण्याचा तिचा निश्चय आहे. यात सर्व खंडांमधील सर्व सर्वोच्च शिखरे सर करून दक्षिण व उत्तर ध्रुवावर स्कीइंग करायचे असते. आजवर मोजकेच साहसवीर हे करू शकले आहेत.

नऊ वर्षांची चढती कमान
वयाच्या तिसºया वर्षी काम्याने लोणावळा परिसरात सह्याद्रीच्या डोंगरांवर प्राथमिक ट्रेकिंग केले. नवव्या वर्षी काम्याने ५,०२० मीटर उंचीच्या रूपकुंडसह हिमालयातील अनेक शिखरे आई-वडिलांसोबत सर केली.
वयाच्या १०व्या वर्षी नेपाळमधील ५,३४२ मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत चढाई. लगोलग लडाखमधील स्टोक कांगडी (६,१५३ मीटर) शिखर सर करणारी सर्वात तरुण गिर्यारोहक ठरण्याचा मान.
त्याच्या पुढील वर्षात किलिमांजारो (५,८९५ मीटर), एलब्रुस (५,६४२ मीटर) आणि कॉस्कीयुस्को (२,२२८ मीटर) या अनुक्रमे आफ्रिका, युरोप व आॅस्ट्रेलिया खंंडांतील सर्वात उंच शिखरांवर यशस्वी चढाई.

Web Title: Mumbai's Kamya set new record for climbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.