Join us  

स्वच्छतेसाठीचे मतप्रदर्शन अ‍ॅपवर, महापालिका जाणून घेणार मुंबईकरांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 1:40 AM

स्वच्छतेच्या परीक्षेत छोटी शहरेही मुंबईला मागे टाकत असल्याने महापालिकेचे टेन्शन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरासाठी ही बाब शरमेची असल्याने पालिका प्रशासन कामाला लागले आहे.

मुंबई : स्वच्छतेच्या परीक्षेत छोटी शहरेही मुंबईला मागे टाकत असल्याने महापालिकेचे टेन्शन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरासाठी ही बाब शरमेची असल्याने पालिका प्रशासन कामाला लागले आहे. स्वच्छता मोहिमेचा प्रचार सोशल मीडियावर करून नेटकरी मुंबईकरांमध्ये जागरूकता निर्माण केल्यानंतर आता नागरिकांचे मत घेण्यासाठी पालिका मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर स्वच्छताविषयक तक्रारींसाठी मोबाइल अ‍ॅप आणून मुंबईकरांचे कौल घेण्याची तयारी पालिकेने केली आहे.केंद्र सरकारने २०१४मध्ये स्वच्छता अभियान जाहीर केल्यानंतर संपूर्ण देशभर ही मोहीम सुरू आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीला २०१९मध्ये दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यापूर्वी भारत देश स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्याचा केंद्राचा निर्धार आहे. मात्र या मोहिमेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई शहर मागे पडले आहे. स्वच्छता सर्वेक्षणात २०१५मध्ये १९व्या क्रमांकावर असलेले मुंबई शहर गेल्या वर्षी २९व्या क्रमांकापर्यंत घसरले. पालिकेने केलेले काम केंद्र सरकार व नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने ही घसरण होत असल्याचा निष्कर्ष पालिकेने काढला आहे. त्यामुळे पालिकेद्वारे लवकरच सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे.या सर्वेक्षणादरम्यान पालिकेने नेमलेल्या संस्थेचे प्रतिनिधी मुंबईकर नागरिकांना भेटून मुंबईतील स्वच्छतेबाबत त्यांचे मत व प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. तसेच स्वच्छताविषयक केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता-एमओएचयूए’ या मोबाइल अ‍ॅपवर तक्रारी नोंदविण्याचे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे. या अ‍ॅपवर नोंदविलेल्या तक्रारींच्या निराकरणासाठी महापालिकेच्या वरळी अभियांत्रिकी संकुलात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. हा कक्ष आठवड्याचे सातही दिवस २४ तास सुरू असणार आहे.मोबाईल अ‍ॅपद्वारे छायचित्रासह स्वच्छता विषयक तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. जेथील छायाचित्र काढले आहे, त्याच ठिकाणी ते छायाचित्र अपलोड केल्यास स्वयंचलित पद्धतीने संबंधित ठिकाणाची माहिती केंद्र सरकारच्या सर्व्हरवर नोंदविली जाईल. तक्रार जेथून आली असेल त्या ठिकाणच्या नागरी सेवा सुविधाविषयक यंत्रणेकडे स्वयंचलित पद्धतीनेच ती पाठविली जाईल.प्राप्त तक्रारींचे निराकरण १२ तासांच्या आत व्हावे यासाठी आवश्यक पाठपुरावा या कक्षाद्वारे केला जाईल. तक्रारीचे निराकरण झाल्यानंतर ती माहिती तक्रारदारास मोबाईल अ‍ॅपद्वारेच मिळणार आहे.‘स्वच्छता-एमओएचयूए’ या मोबाइल अ‍ॅपचे १८ हजार ६७४ युजर्स एकट्या नवी मुंबईत आहेत. त्यापाठोपाठ पुण्यात ११ हजार ६७४ लोक हे अ‍ॅप वापरतात. मुंबईत मात्र ही संख्या ९ हजार २५२ इतकीच आहे.गेल्या वेळेस अ‍ॅपद्वारे झालेल्या सर्वेक्षणात देशातील ४३४ शहरांनी सहभाग घेतला होता. मात्र या सर्वेक्षणात दोन हजार गुणांपैकी दीडशे गुण मोबाइल अ‍ॅपसाठी राखीव होते. कचरा उचलणे, घनकचरा व्यवस्थापन, शौचालयांचे बांधकाम आदी निकष निश्चित करण्यात आले होते. त्याचबरोबर स्वच्छतेसंदर्भात अ‍ॅपवर आलेल्या नागरिकांच्या तक्रारींची दखल पालिका किती वेळेत घेते? याकडे केंद्राचे बारीक लक्ष होते.असे केले जाणार सर्वेक्षणसर्वेक्षणासाठी नियुक्त संस्थेचे २५ प्रतिनिधी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून मुंबईतील स्वच्छतेबाबत नागरिकांच्या अपेक्षा व प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत.तसेच मोबाइल अ‍ॅपद्वारे तक्रार कशी नोंदवावी, याची माहिती नागरिकांना या सर्वेक्षणादरम्यान प्रात्यक्षिकासह दिली जाणार आहे. सोशल मीडियाद्वारे कोणतीही बातमी वेगाने पोहोचत असते.याचा फायदा आता महापालिकाही करून घेणार आहे. त्यामुळे या कामासाठी एका खाजगी संस्थेला नेमून स्वच्छतेचा हायटेक संदेश देण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका