वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात मुंबईकर आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 06:13 AM2019-09-17T06:13:28+5:302019-09-17T06:13:43+5:30

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.

Mumbaikar leads in violation of traffic rules | वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात मुंबईकर आघाडीवर

वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात मुंबईकर आघाडीवर

Next

मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. काही गुन्ह्यांमध्ये तर परवाना रद्द केला जातो; पण असे असतानाही चालक वाहतूक नियम पाळताना दिसत नाहीत. या नियम मोडणाºया चालकांमध्ये मुंबईकर आघाडीवर आहेत. राज्यात चार महिन्यांत भरधाव वेगात वाहने चालविण्याच्या ७७,४०४ प्रकारांपैकी मुंबईत ७१,७९८ घटना घडल्या आहेत. तर राज्यातील ३,४९१ वाहन चालकांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) पाठविण्यात आला आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
महामार्ग पोलिसांनी जानेवारी ते एप्रिलदरम्यान राज्यभरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या घटनांची आकडेवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भरधाव वेगात वाहने चालविण्यामध्ये मुंबईचा पहिला क्रमांक आहे, त्यानंतर ३,८७५ घटनांसह ठाणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो. नागपूर शहरात ४५७ जणांनी वेगात वाहने चालविली तर नवी मुंबईत २७५ आणि अकोल्यात १६२ जणांनी वेगाची मर्यादा ओलांडली आहे.
राज्यात चार महिन्यांत वाहन चालविताना ८०,५०१ जणांनी फोनचा वापर केल्याच्या घटना घडल्या असून यापैकी १४,२७७ वाहन चालकांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओ विभागाकडे पाठविण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वाहने चालविताना फोन वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. यात पिंपरी चिंचवडमध्ये २३,९०५; मुंबईत १३,७५५; नागपूर ५,०३४; ठाणे जिल्हा ३,६३५; ठाणे शहर ३,३८६; नवी मुंबई ३,२२२; सोलापूर २,६८९; पुणे शहर २,५९४ तसेच कोल्हापूर येथील २,४६४ जणांचा समावेश आहे. तसेच मालवाहतूक वाहनांमधून ८,५१४ जणांनी प्रवासी वाहतूक केली आहे. यामधील ४,१७७ जणांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर सिग्नल तोडण्याचा १,१७,२१२ घटना आहेत. यामध्ये मुंबईत ५४,१९९; पिंपरी चिंचवड १३,५९३; ठाणे शहर ११,४८७; नागपूर १०,३८० तसेच पुणे शहरातील ९,८४१ घटनांचा समावेश आहे. मद्यपान करून वाहने चालविण्यात नागपूरकर पुढे आहेत. राज्यातील २९,८०४ घटनांपैकी ७,५२१ घटना नागपूरच्या आहेत. तर मुंबईत ५,५४१; ठाणे शहर ३,९९८ आणि पुणे शहरात २,७३७ घटनांची नोंद आहे. यातील ५७९ चालकांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओला पाठविण्यात आला आहे.
>चार हजार जणांचा परवाना रद्द
महामार्ग पोलिसांनी जानेवारी ते एप्रिल २०१९ दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या ३,३०,८४७ घटना घडल्या आहेत. यामध्ये वेगात वाहन चालवणे, वाहन चालवताना फोनचा वापर करणे, मद्यपान करून वाहन चालवणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. या घटनांपैकी ४०,६४२ जणांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यात आला होता. त्यापैकी ४,०६४ जणांचा परवाना आरटीओने रद्द केला आहे.

Web Title: Mumbaikar leads in violation of traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.