Join us  

मुंबईकर झाले घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 4:59 AM

मागील आठवड्यात ऐन सायंकाळी मुंबईत कोसळणा-या धारांनी आता ब्रेक घेतला असतानाच वाढत्या उकाड्याने मुंबईला घाम फोडला आहे. परतीचा पाऊस सुरू झाल्यापासून उकाडा प्रचंड वाढला...

मुंबई : मागील आठवड्यात ऐन सायंकाळी मुंबईत कोसळणा-या धारांनी आता ब्रेक घेतला असतानाच वाढत्या उकाड्याने मुंबईला घाम फोडला आहे. परतीचा पाऊस सुरू झाल्यापासून उकाडा प्रचंड वाढला असून, आॅक्टोबर हिटने मुंबई चांगलीच तापली आहे. महत्त्वाचे म्हणजे थंडीची चाहूल लागेपर्यंत आॅक्टोबर हिटचा तडाखा कायम राहणार असून, मुंबईकर घामाघूम होणार आहेत.भारतीय हवामान शास्त्र विभागाने मान्सून रविवारी महाराष्ट्रातून परतीच्या प्रवासावर निघाल्याची घोषणा केली. तत्पूर्वी मुंबईसह राज्यात पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. आता मुंबई वगळता राज्यात पावसाचा तडाखा सुरूच असून, मुंबईत मात्र पावसाने ब्रेक घेतला आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, आर्द्रता ८० टक्क्यांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. वातावरणातील हे फेरबदल मुंबईकरांच्या नाकीनऊ आणत असून, मंगळवारी वातावरणातील उकाड्याने मुंबईकरांना चांगलाच घाम फुटला. विशेष म्हणजे दिवाळीसाठी बाजारपेठांतील गर्दीत वाढ होत असून, दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अशाच काहीशा उत्साही वातावरणात फुटणारा घाम आणि तापदायक ऊन मुंबईकरांना नकोसे झाले असले तरी आॅक्टोबर हिटचा तडाखा आणखी पंधराएक दिवस कायम राहणार असल्याने मुंबईकरांच्या शरीराहून घामाच्या धारा वाहणार आहेत.

टॅग्स :मुंबई