महापालिका प्रशासनाचे लक्ष्य
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुढच्यावर्षी महापालिका निवडणुका असल्याने मुंबई पूरमुक्त करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. या कामाचा आढावा मुख्यमंत्री स्वतः घेत असल्याने पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यानुसार हमखास तुंबणाऱ्या ५८ अतिसंवेदनशील स्थळांची यादी तयार करण्यात आली आहे. यापैकी बहुतांशी ठिकाणं २०२२ च्या पावसाळ्यापूर्वी पूरमुक्त होतील, याची जबाबदारी पालिकेने घेतली आहे.
महापालिकेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई ३८६ ठिकाणी पावसाचे पाणी साचते. या प्रत्येक ठिकाणांचे सूक्ष्म नियोजन करून पूरमुक्त करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. यापैकी १७१ ठिकाणांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तर ११८ स्थळ यावर्षीच्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहेत. एकूण ५८ ठिकाणं अतिसंवेदनशील असल्याने प्राधान्याने त्याच्यावर काम केले जाणार आहे. यापैकी काही कामांसाठी निविदाप्रक्रिया सुरू असून ७१५.५१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
* यासाठीच पूरमुक्तीचा अजेंडा
- महापालिका आणि राज्यात शिवसेनेचे सरकार आहे. राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर एकत्र असले तरी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक प्रतिष्ठेचे असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महापालिकेच्या कामकाजावर बारीक लक्ष आहे. यात तुंबापुरीचा प्रश्न ज्वलंत ठरत असल्याने मुंबईची पुरातून सुटका करणे हा प्रमुख अजेंडा ठरणार आहे.
* या कामांना प्राधान्य
नाल्यांचे रुंदीकरण, पावसाचे पाणी उपसण्यासाठी अतिरिक्त पंप लावणे, पर्जन्य वाहिन्यांच्या रुंदीकरण कामातील अडथळे काढणे आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त पर्जन्य वाहिन्या बांधणे या कामाचा समावेश आहे. यासाठी आगामी आर्थिक वर्षात दीडशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
* ब्रिमस्टोवॅड प्रकल्प संथगतीने
मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी २००५ मध्ये तयार करण्यात आलेल्या ब्रिमस्टोवॅड प्रकल्पानुसार पर्जन्यजल वाहिन्यांची ५८ काम करण्यात येणार होती. गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या कामांपैकी ४० काम पूर्ण झाली आहेत, तर १५ काम सुरू असून, तीन लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
-------------------------