Join us  

पूरग्रस्तांसाठी मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:07 AM

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कक्षेतील महाड आणि चिपळूण येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेकांवर संकटकालीन परिस्थिती ओढवली आहे. ...

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कक्षेतील महाड आणि चिपळूण येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेकांवर संकटकालीन परिस्थिती ओढवली आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत मुंबई विद्यापीठाने महत्त्वाचे पाऊल उचलून गरजवंतांना अन्नाचे वाटप करण्यासाठी महाड येथील हिरवळ महाविद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या सहकार्याने कम्युनिटी किचनला सुरुवात केली आहे. ‘कम्युनिटी किचन’ या संकल्पनेअंतर्गत दररोज ३०० गरजू लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि विद्यार्थी विकास विभागाने याकामी पुढाकार घेतला आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड आणि चिपळूणसह अनेक ठिकाणी संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली. यासाठी विद्यापीठामार्फत नुकताच पाहणी दौरा करण्यात आला. त्यात महाडमधील महाविद्यालयांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयातील कार्यशाळा, कार्यालय, प्रयोगशाळा, दस्तऐवजांचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाल्याचे आढळून आले. विद्यापीठाच्या वतीने गरजेच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर टेमघर गावातील २०० कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. मुंबई विद्यापीठ आणि डी.बी.जे. महाविद्यालय चिपळूण यांच्या सहकार्यांने २८ तारखेपासून दुसरे कम्युनिटी किचन सुरू करण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकीतून अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी विद्यापीठाने शासनाच्या सहकार्यातून गेल्या वर्षी गरजवंतांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. समाजसेवेसाठी विद्यापीठाला ही एक संधी मिळाली असून, समाजसेवेचा वसा हा असाच अविरत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. तसेच गरजवंतांसाठी इच्छुकांनी सढळहस्ते मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.