Join us  

मुंबई विद्यापीठाचे शानदार जेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:54 AM

अनघा नार्वेकरची भेदक गोलंदाजी आणि दर्शना पवारचे शानदार अर्धशतक या जोरावर मुंबई विद्यापीठ संघाने पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ९ बळींनी धुव्वा उडवला.

मुंबई : अनघा नार्वेकरची भेदक गोलंदाजी आणि दर्शना पवारचे शानदार अर्धशतक या जोरावर मुंबई विद्यापीठ संघाने पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ९ बळींनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना पुणे संघाचा डाव ४० षटकांत ८ बाद १४३ धावांवर रोखल्यानंतर, मुंबईकरांनी २३.२ षटकांतच एका फलंदाजाच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले.नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या यजमान पदाखाली झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबई विद्यापीठाने आपल्या लौकिकानुसार वर्चस्व राखले. मुंबईकर गोलंदाजांच्या भेदकतेपुढे पुणेकरांना मनमोकळेपणे फटकेबाजी करण्यात अपयश आले. १४४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई संघाला पूजा जाधव आणि दर्शना पवार यांनी धमाकेदार सुरुवात करून दिली. या दोघींनीही दमदार फलंदाजी करत मुंबईचे जेतेपद निश्चित केले. दर्शनाने ६८ चेंडूंत १० चौकारांसह ६२ धावांची भक्कम खेळी केली. पूजाने ५३ चेंडूंत २ चौकारांसह नाबाद ४० धावा, तर शोबिता बामणे हिने १६ चेंडूंत २ चौकारांसह नाबाद १२ धावा करून मुंबईच्या विजयावर शिक्का मारला.तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाºया पुणे विद्यापीठ संघाचा डाव मुंबईकरांच्या भेदकतेपुढे अडखळला. अनघाने ८ षटकांमध्ये ३ षटके निर्धाव टाकत, केवळ ११ धावांत ३ महत्त्वपूर्ण बळी घेत पुणे संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. नेहा रंगराजण हिनेही ३४ धावांत २ बळी घेत अनघाला चांगली साथ दिली. मधल्या फळीतील प्रज्ञा मांडलिक हिने ७८ चेंडूंत २९ धावांची नाबाद खेळी करून पुण्याच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला, तसेच दहाव्या क्रमांकावरील तेजश्री ननावरे हिने ३१ चेंडंूत ३ चौकारांसह नाबाद २६ धावा करत पुण्याला समाधानकारक मजल मारून दिली, परंतु मुंबईच्या पूजा - दर्शना या सलामीवीरांच्या आक्रमकतेपुढे पुण्याचा एकतर्फी पराभव झाला.