Join us  

१६ ते २४ जानेवारी दरम्यान मुंबई विद्यापीठाचे स्कुल कनेक्ट

By रेश्मा शिवडेकर | Published: January 12, 2024 5:04 PM

विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती उपलब्ध करून दिली जाईल.

मुंबई : पदवी, बारावीनंतरच्या करीअरविषयक संधी, व्यावसायिक अभ्यासक्रम यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या वतीने १६ ते २४ जानेवारी दरम्यान स्कुल कनेक्ट हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील संलग्नित विविध महाविद्यालये, समुह महाविद्यालये, लीड महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्यात येईल. यासाठी विद्यापीठाने सम्यक योजना तयार केली आहे. विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता आणि विद्याशाखेच्या विविध सदस्यांच्या माध्यमातून विद्यापीठाद्वारे विविध महाविद्यालयात हे संपर्क अभियान राबविले जाणार आहे.

विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सातही जिल्हयात हे संपर्क अभियान राबविले जाणार आहे. १६ जानेवारीला मुंबई आणि मुंबई उपनगर, १७ जानेवारी रोजी ठाणे आणि रायगड, १८ जानेवारीला पालघर, २३ जानेवारी रोजी रत्नागिरी आणि २४ जानेवारी २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्कूल कनेक्ट अभियाअंतर्गत संपर्क अभियान राबविले जाणार आहे, असे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू तथा विद्यापीठाच्या स्कूल कनेक्ट समन्वय समितीचे प्रमुख प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी सांगितले.

काय करणार?- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० मधील विद्यार्थीकेंद्री बदलांविषयी आणि त्यांच्या हितकारक परिणामांविषयी यात माहिती दिली जाईल.- अनुभवाधिष्ठित, बहुविद्याशाखीय लवचिक अभ्यासक्रमांविषयी सविस्तर माहिती देणे.- अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट असलेल्या कल्पक, नावीन्यपूर्ण, व्यावसायिक आणि कौशल्यावर आधारित संबोधनाविषयी विशेषत्वाने माहिती देणे.- मूल्यमापनातील श्रेयांक पद्धती आणि त्यामुळे आलेली लवचिकता समजावून सांगणे.- दूर व मुक्त शिक्षणातील संधीविषयी माहिती देणे, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी असलेल्या विविध योजना आणि उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्ती विषयी सविस्तर माहिती देणे.- विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती उपलब्ध करून दिली जाईल.

विद्यापीठाचे अभ्यासक्रमबिगर स्वायत्त महाविद्यालयांसाठी विविध विद्याशाखांसाठी तीन आणि चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम तयार केले असून या शैक्षणिक वर्षांपासून सुमारे ८१२ संलग्नित महाविद्यालयांत हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. त्याअनुंषगानेही विद्यार्थ्यांमध्ये व्यापक प्रमाणात जागृती करण्यासाठी हे संपर्क अभियान उपयुक्त ठरणार आहे.