जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:03 IST2025-05-13T17:59:54+5:302025-05-13T18:03:04+5:30
Mumbai Police: मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून या घटनेची माहिती दिली

जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
मुंबईच्या बी.डी. सोमाणी जंक्शन येथे एका महिलेला समुद्रात बुडताना पाहून मुंबई वाहतूक पोलीस दलातील हवालदार भिकाजी गोसावी यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी मारली. मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून या घटनेची माहिती दिली. या पोस्टवर मुंबईकरांकह अनेकांनी प्रतिक्रिया देत भिकाजी यांच्या धाडसाचे कौतुक केले.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कफ परेड येथील सोमाणी जंक्शन येथे भिकाजी कर्तव्यावर असताना एका अज्ञात महिलेने पाण्यात उडी मारल्याचे त्यांनी पाहिले. भिकाजी यांनी वेळ न घालवता ताबडतोब नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. संबंधित महिलेला पाण्याबाहेर काढल्यानंतर भिकाजी यांनी तिला सीपीआर दिला. त्यानंतर या महिलेला तात्काळ जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या महिलेने आत्महत्या करण्यासाठी पाण्यात उडी मारली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
PC Bhikaji Gosavi, while on duty at B.D. Somani Junction saw an unidentified woman jump into the sea. While the on-duty officers informed the control room, PC Gosavi, without wasting any time, jumped into the sea and attempted to rescue the woman. pic.twitter.com/8pX1bnhVhx
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) May 13, 2025
या महिलेचा जीव वाचवता आला नसला तरी भिकाजी यांच्या धाडसाचे संपूर्ण महाराष्ट्र कौतुक करत आहे. मुंबई पोलिसांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने लिहिले आहे की, 'आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.' दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, 'शाबास भिकाजी गोसावी आम्हाला तुमचा अभिमान आहे, सदैव निरोगी राहा. पावसळ्यात आम्हाला पुन्हा तुमची गरज भासू शकते.'