MUMBAI RAINS UPDATE HEAVY MUMBAI RAINS TO CONTINUE TODAY | Mumbai Rain Updates : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस 
Mumbai Rain Updates : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस 

ठळक मुद्देमुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबई - मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत देशासह राज्य आणि मुंबईला झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या मार्गाला लागला आहे. 19 सप्टेंबरला राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली होती. 

सध्या मुंबईत पाऊस सुरू असून माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये पावसाची  जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत आहे. मुलुंड, घाटकोपरमध्येही रिमझिम पाऊस आहे. मात्र ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मुंबई आणि काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

रायगड व पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, तर 20 सप्टेंबर रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्रासह मध्य भारतात 18 ते 23 सप्टेंबर या काळात पावसाचा जोर वाढेल. उत्तर कोकणातही पावसाचा जोर वाढेल अशी माहिती मिळत आहे. हवामानशास्त्र विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर मुंबई महापालिकाही खडबडून जागी झाली आहे. ‘मुंबईकरांनो, समुद्रात जाणे टाळा, शिवाय पाणी भरलेल्या ठिकाणीही जाणे टाळा. आपली काळजी घ्या. मदत लागल्यास 1916 या हेल्पलाइनवर संपर्क साधा,’ असे पालिकेने आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून मुंबईकरांना आवाहन केले आहे.

मान्सून आणखी एक रेकॉर्ड ब्रेक करणार

मुंबईत 1958 साली 3 हजार 759.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आहे. या वर्षीच्या पावसाच्या नोंदीचा विचार करता, जून महिन्यापासून 18 सप्टेंबरपर्यंत मुंबईत 3 हजार 475.2 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. 1958 सालचा आपलाच विक्रम मोडीत काढण्यास मान्सूनला या वर्षी 284.5 मिलीमीटर पावसाची गरज असून, सप्टेंबर महिना संपेपर्यंत मान्सून हा आणखी एक रेकॉर्ड ब्रेक करण्याची शक्यता आहे. दरम्यान, 1986 साली मुंबईत 1 हजार 341. 9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा मुंबईतील आतापर्यंत सर्वाधिक कमी पाऊस आहे.

 


Web Title: MUMBAI RAINS UPDATE HEAVY MUMBAI RAINS TO CONTINUE TODAY
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.