Mumbai Rain Updates : मुंबईतील 'या' विभागात पडला सर्वाधिक पाऊस, महापालिकेने दिली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 03:38 PM2019-09-04T15:38:09+5:302019-09-04T15:52:37+5:30

मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे.  

Mumbai Rains and Traffic Updates: BMC asks citizens to stay indoors; trains, buses disrupted | Mumbai Rain Updates : मुंबईतील 'या' विभागात पडला सर्वाधिक पाऊस, महापालिकेने दिली आकडेवारी

Mumbai Rain Updates : मुंबईतील 'या' विभागात पडला सर्वाधिक पाऊस, महापालिकेने दिली आकडेवारी

Next

मुंबई - मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी (4 सप्टेंबर) सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीत सर्वाधिक पावसाची नोंद ही महापालिकेच्या के पूर्व (अंधेरी पूर्व) विभाग कार्यक्षेत्रात झाली असून या परिसरात 214.35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे.  

शहर भागात सर्वाधिक पाऊस दादर परिसरात झाला असून तिथे 168.15 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. या खालोखाल वडाळा परिसरात 158.97, धारावी परिसरात 148.58, रावळी कॅम्प परिसरात 139.2 एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तर हिंदमाता परिसराचा समावेश असलेल्या एफ दक्षिण विभागात 113.78 मीमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे‌. मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे याच कालावधीत एकूण 69.35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पूर्व उपनगरांमध्ये  सर्वाधिक म्हणजे 184.17 मिलिमीटर पावसाची नोंद विक्रोळी परिसरात झाली आहे. या खालोखाल कुर्ला परिसरात 147.84 मिलिमीटर, भांडुप परिसराचा समावेश असणाऱ्या एस विभागात 144.02 मिमी, चेंबूर परिसरात 132.0, तर घाटकोपर परिसराचा समावेश असलेल्या एन विभागामध्ये 124.95 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक पाऊस अंधेरी पूर्व परिसरात 214.35 मिलीमीटर, के पश्चिम विभागात म्हणजेच प्रमुख्याने अंधेरी पश्चिम परिसरात 200.17 मिलिमीटर, मरोळ परिसरात 183.38, विलेपार्ले 182.87, तर कांदिवली परिसरात 170.67 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा, यासाठी महापालिकेच्या सर्व सहा उदंचन केंद्रांमधील पंप आवश्यक तेवढ्या संख्येने चालू करण्यात आले आहेत. 

प्रत्येक उदंचन केंद्रात तेथील आवश्यकतेनुसार सहा ते दहा एवढ्या संख्येने पंप असून या प्रत्येक पंपाची क्षमता ही दर सेकंदाला तब्बल 6 हजार 600 लिटर पाण्याचा उपसा करण्याची आहे. सर्व सहा उदंचन केंद्रांमध्ये एकूण 43 पंप असून त्या त्या भागातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता त्यापैकी 24 पंप सध्या सुरू करण्यात आले आहेत. मुसळधार पावसाचा फटका हा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला देखील बसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची मध्य रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सायन-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच विक्रोळी-कांजुरमार्गदरम्यान पाणी साचल्याने धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

ठाणे ते कसारा, कर्जत वाहतूक सुरू आहे. मध्य रेल्वेपाठोपाठपश्चिम रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावरील वाशी त सीएसएमटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नालासोपारा स्टेशनवर रुळावर पाणी साचलं आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. वसई-विरार दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

आपत्ती विभाग व्यवस्थापनाला आणि इतर विभागांना दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जोरदार पावसामुळे मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आज मुंबई, कोकण आणि ठाण्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. तसेच राज्यातील शाळांना पावसाची परिस्थिती पाहून स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्देश शेलार यांनी दिले आहेत. 

Web Title: Mumbai Rains and Traffic Updates: BMC asks citizens to stay indoors; trains, buses disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.