मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १६४ गुन्हेगारांना केले शहरातून हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 03:58 AM2019-10-20T03:58:33+5:302019-10-20T05:31:29+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Mumbai police tighten up; 164 criminals banished from the city | मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १६४ गुन्हेगारांना केले शहरातून हद्दपार

मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १६४ गुन्हेगारांना केले शहरातून हद्दपार

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून मुंबई पोलिसांनी गुन्हेगारांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करत, मुंबईतून १६४ गुन्हेगारांना शहरातून हद्दपार करण्यात आले आहे, तसेच दहशतवाद्यांकडून अतिरेकी कारवायाच्या शक्यतेने खबरदारीचा उपाय म्हणून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शहरातील सर्व हालचालींवर करडी नजर ठेवली आहे.

मुंबई उपनगरातील २६, तर शहरातील १० अशा एकूण ३६ विधानसभा मतदार संघातील १ हजार ५३७ ठिकाणी ९ हजार ९९१ बुथवर मतदान होणार आहे. त्यात मुंबईमध्ये एकूण २६९ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याने या ठिकाणच्या बंदोबस्तात अधिक वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदानाच्या दिवशी मुंबई पोलीस दलातील ४० हजार पोलीस अधिकारी आणि अंमलदार शहरात तैनात राहणार असून, त्यांच्या दिमतीला केंद्रीय सुरक्षा बलाच्या २२ कंपन्या, एसआरपीएफच्या १२ आरपीएफच्या 4 प्लॅटून आणि 2 हजार 700 होमगार्ड तैनात असणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने मुंबईतील विविध ठिकाणांहून २९ कोटींची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. मुंबईतील ३६ मतदारसंघांत जलद प्रतिसाद पथकाने छापे मारून ही कारवाई केली. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून प्राप्तिकर खात्याने मुंबईत विविध ठिकाणी छापे मारत २९ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली. दरम्यान, ऐरोली मतदारसंघातील घणसोली सेक्टर ६ येथे नाकाबंदी सुरू असताना भरारी पथकाने दोन लाख ६५ हजारांची रक्कम पकडली असून ही रक्कम रबाळे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.

चार कोटींची रोख वरळीत पकडली

निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाने शनिवारी सायंकाळी वरळी विधानसभा मतदारसंघात चार कोटींची रोकड हस्तगत केली. वांद्रे वरळी सागरी सेतूजवळील तटरक्षक दलाच्या चेक पोस्टजवळ तपासणीत ही रोकड आढळली. मात्र रात्री उशिरा ही रक्कम दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेची असल्याचे स्पष्ट झाले.आरपीएफच्या ४ प्लॅटून आणि २ हजार ७०० होमगार्ड तैनात असणार आहेत.

शहरात प्रवशेद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून संशयित वाहने, वस्तू, व्यक्तिंवर पोलीस लक्ष ठेवून आहे, तसेच नियंत्रण कक्षातील पाच हजार सीसीटीव्हीद्वारे पोलीस सर्व घटनांवर वॉच ठेवून असणार आहेत. निवडणूक आयोगासह अन्य यंत्रणांची भरारी पथकेही शहरातील सर्व हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत.

पोलिसांनी विशेष मोहीम राबवून १६४ गुन्हेगारांना शहरातून हद्दपार केले असून, ४ जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे, तसेच २ हजार ४३ जणांना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. ५ हजार ४३१ जणांकडून जात मुचलके भरून घेतले आहे, तसेच १ हजार ९७९ जणांना नोटिसा बजावल्या आहेत.
तसेच यंत्रणेकडून १६९ ठिकाणी कारवाई करून १० लाख ८० हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. शिवाय, ५५ कारवाईमध्ये ७ लाख १२ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, गुन्हेगारांकडून ५११ अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.

१० हजार पोलीस करणार पोस्टल मतदान

मुंबई पोलीस दलातील सुमारे १० हजार पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदानासाठी नोंद केली आहे.

Web Title: Mumbai police tighten up; 164 criminals banished from the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.