Join us  

मुंबईत २२ वर्षांत केवळ ९.९ टक्के यकृतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 6:06 AM

गेल्या काही वर्षांत अवयवदानाविषयी जनजागृती वाढू लागली असली तरीही अजूनही या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त व्हायचे आहे.

- स्नेहा मोरे मुंबई : गेल्या काही वर्षांत अवयवदानाविषयी जनजागृती वाढू लागली असली तरीही अजूनही या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त व्हायचे आहे. आजही समाजाच्या तळागाळात अवयवदानाविषयी अनेक गैरसमजुती आहेत. मात्र त्या दूर सारण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरू आहे. पण जनजागृतीअभावी मुंबईत गेल्या २२ वर्षांत यकृतदानाचा आलेख अवघा ९.९ टक्के असल्याचे मुंबई जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीने (झेडटीसीसी) दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.यकृत प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णावर यशस्वी प्रत्यारोपणानंतर त्याला सर्वच दृष्टीने एक नवीन आयुष्य मिळू शकते. यासाठी योग्य रुग्णाला योग्य त्या वेळी यकृत प्रत्यारोपण केले गेले पाहिजे. मात्र अजूनही यकृत प्रत्यारोपणाविषयी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीच्या माहितीनुसार, १९७७ पासून २७ मार्च २०१९ पर्यंत ३ हजार १९८ जणांनी यकृत प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली होती. मात्र यातील केवळ ३१९ जणांवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. तर अजूनही ४६९ रुग्ण प्रतीक्षायादीत आहेत. १९९७ ते २००१ सालापर्यंत एकही यकृत प्रत्यारोपण झाले नाही, थेट २००२ साली दोन यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या. २०१० सालानंतर यकृत प्रत्यारोणाला गती मिळाली. १ जानेवारी २०१९ ते २८ मार्च २०१९ या कालावधीत २० यकृत प्रत्यारोपित करण्यात आले.>पुढाकार घेणे गरजेचे!याविषयी झेडटीसीसीचे समन्वयक डॉ. भरत शहा यांनी सांगितले की, समितीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अवयवदानाविषयी जनजागृतीचे काम सुरू आहे.त्याचप्रमाणे ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी महाविद्यालयीन तरुण पिढीलाही सहभागी करून घेण्यात येत आहेत. अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन अवयवदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे.