Join us  

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे पुरस्कार जाहीर; सर्वोत्कृष्ट कलावंत म्हणून भरत जाधव यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2024 7:51 PM

सर्वोत्कृष्ठ सेवेसाठी १२ कर्मचाऱ्यांना रा.को.फाटक, रामचंद्र डिंगे, चंद्रिका नाडकर्णी, जयश्री पावसकर आणि त्रिंबक एरंडे पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

मुंबई - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने प्रतिवर्षी साहित्य,नाटय व सर्वोत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराचे वितरण संस्थेच्या वार्षिकोत्सवात केले जातात. यावर्षीचे नटवर्य मामा पेडसे उत्कृष्ठ नाटककार पुरस्कार स्वप्निल जाधव तसेच, सर्वोत्कृष्ट कलावंत म्हणून भरत जाधव यांना  'अस्तित्व 'या नाटकासाठी देण्यात आले आहेत.  

तसेच नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत नटवर्य केशवराव दाते जीवनगौरव पुरस्कार १५ वर्षे रंगभूमीशी निगडीत कलावंतास दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार प्रकाश योजनाकार शीतल तळपदे यांना जाहीर झाला आहे. परीक्षक म्हणून पत्रकार समीक्षक शीतल करदेकर यांनी काम पाहिले. प्रा. वि. ह. कुळकर्णी पुरस्कारासाठी किरण शिवहर डोंगरदिवे यांच्या देशभक्त हि.सो.उर्फ बाबुराव पाटील या चरित्र ग्रंथास जाहीर झाले . परीक्षक प्रा.सुहासिनी किर्तीकर यांनी काम पाहिले. सर्वोत्कृष्ठ सेवेसाठी १२ कर्मचाऱ्यांना रा.को.फाटक, रामचंद्र डिंगे, चंद्रिका नाडकर्णी, जयश्री पावसकर आणि त्रिंबक एरंडे पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी १२५ वा वार्षिकोत्सव ६ एप्रिल २०२४ रोजी सांयकाळी ६.०० वा जेष्ठ साहित्यिक व ९७ व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून सदर पारितोषिकांचे वितरण संस्थेच्या शारदा मंगल सभागृहात,दादर पूर्व येथे संपन्न होणार आहे.