Join us

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १९९ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत रविवारी काेरानाच्या नवीन ९४० रुग्णांचे निदान झाले असून १८ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत रविवारी काेरानाच्या नवीन ९४० रुग्णांचे निदान झाले असून १८ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ८२ हजार ८२१ झाली असून बळींचा आकडा १० हजार ८६५ झाला आहे. शहर, उपनगरात सध्या १५ हजार ६१० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १९९ दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या १८ लाख ८५ हजार ७१७ चाचण्या झाल्या आहेत. तर २२ ते २८ नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहर, उपनगरातील चाळ व झोपडपट्ट्यांच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या ४३४ झाली आहे. मुंबईत सक्रिय सीलबंद इमारती ५ हजार २१२ आहेत. मागील २४ तासांत पालिकेने अतिजोखमीच्या ६ हजार २५६ सहवासितांचा शोध घेतला आहे.

* शोध मोहिमेतून १५० नव्या रुग्णांचे निदान

कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या मोहिमेंतर्गंत मागील पाच दिवसांत प्रशासनाने १५० कोरोना रुग्णांचा शोध घेतला आहे. नव्याने आढळलेले हे रुग्ण विक्रेते असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या चाचण्यांतून त्यांचे निदान करण्यात आले. पाच दिवसांत एकूण १२ हजार फेरीवाले, विक्रेत्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत सध्या दिवसाला १८ ते १९ हजार कोरोना चाचण्या कऱण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.