Join us  

मुंबई देशातील सर्वात स्वच्छ राजधानी , स्वच्छ भारत योजनेत राज्यातील २८ शहरे पहिल्या शंभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 7:08 AM

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये देशातील स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मुंबईस मिळाला आहे.

मुंबई : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये देशातील स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मुंबईस मिळाला आहे. तर एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या (अमृत शहरे) स्पर्धेत नवी मुंबईने ९ आणि पुण्याने दहावा क्रमांक मिळवला आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पश्चिम विभागातील १०० शहरांपैकी पाचगणी, शिर्डी, काटोल, मलकापूर, लोणावळा, औसा व भोर या सात शहरांचा समावेश झाला आहे.देशातील स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मुंबईस मिळाला असून घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबईने बाजी मारली. राज्यातील २८ शहरांनी पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळविले आहे. एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागात राज्यातील ५८ शहरांनी स्थान मिळविले आहे. ही क्रमवारी शनिवारी जाहीर करण्यात आली. स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेइंदूर येथे राज्याला गौरविण्यातआले. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ४ जानेवारी २०१८ ते १० मार्च २०१८ या कालावधीत देशातील ४,२०३ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये राज्यातील ४३ अमृत शहरांनी तर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या २१७ शहरांनी सहभाग घेतला होता.सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराला पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा तर नागरिक प्रतिसादाच्या बाबतीत अमरावती जिल्ह्यातील शेंदुर्जना घाट शहराला आणि पुणे जिल्ह्यातील सासवडला नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.शिर्डीला १५ कोटींचे बक्षीससार्इंच्या शिर्डीने एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी शहरांच्या वर्गात देशात तिसरा व राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे़ राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल शिर्डी नगरपंचायतीला तब्बल पंधरा कोटींचे बक्षीस मिळणार आहे़ तरुणांनी ‘ग्रीन शिर्डी क्लिन शिर्डी’च्या माध्यमातून चार वर्षांपूूर्वी स्वच्छतेची मुहुर्तमेढ रोवली़स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ९ शहरे आली आहेत. यातील ६ शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे तर ३ शहरांना विभागस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.यामध्ये नागपूर शहराला नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा, परभणीला नागरिक प्रतिसादमध्ये, भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहराचा, भुसावळ शहरास गतिमान लहान शहर पुरस्कार जाहीर झाला.