Join us  

मुंबई @ १५.२ अंश सेल्सिअस, या मोसमातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 4:23 AM

मुंबई : गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे़ चालू मोसमातील हे आतापर्यंतचे नीचांकी किमान तापमान आहे. तत्पूर्वी मागील आठवड्यातच मुंबईचे किमान तापमान १५.८ अंश नोंदविण्यात आले होते. यात अवघ्या पॉइंट सहाने घट झाली आहे. मात्र तरीही किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे मुंबई चांगलीच गारठली असून, मुंबईकरांना हुडहुडी भरली आहे.ओखी चक्रीवादळाचा परिणाम, सातत्याने दाटून येत असलेले मळभ, तुरळक पावसाची नोंद या प्रमुख घटकांमुळे मुंबईच्या कमाल, किमान तापमानात घट नोंदविण्यात येत होती. वातावरणात बदल नोंदविण्यात आले आणि तापमानात पुन्हा वाढ झाली तसेच कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २४, २० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात आले. बुधवारी मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण होते. मुंबई शहरासह उपनगरावर ढग जमा झाले होते. वातावरणातील या बदलाचा काहीसा परिणाम म्हणून तापमानात घट झाली आणि गुरुवारी किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.दरम्यान, मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या किमान तापमानातही घट झाली आहे. विशेषत: नाशिक, जळगाव, सोलापूरसह पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांतही किमान तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. परिणामी पडलेला गारठा आणखी वाढत आहे.बोचरे वारे-किमान तापमानात होत असलेली घट, गारे वारे थंडीत भर घालत असून, आता रात्रीसह दिवसाही मुंबईच्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. रात्री वाहणारे बोचरे वारे गारव्यात भर घालत असून, येथील आल्हादायक वातावरण मुंबईकरांना सुखावत आहे.

टॅग्स :मुंबई