मुक्काम पोस्ट महामुंबई : प्लॅनिंग भाजपचे, स्वबळ काँग्रेसचे, सुशेगात राष्ट्रवादी

By अतुल कुलकर्णी | Published: September 26, 2022 05:56 AM2022-09-26T05:56:18+5:302022-09-26T05:58:29+5:30

मराठी मतांची बेगमी करण्यासाठी आशिष शेलार यांच्याकडे भाजपने मुंबईचे अध्यक्षपद देऊ केले आहे, तर गुजराती आणि अन्य भाषिक मतांसाठी मुंबईचे पालकमंत्रिपद मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिले आहे.

mukkam Post Mahamumbai spacial article on upcoming elections mumbai planning bjp ncp congress shiv sena | मुक्काम पोस्ट महामुंबई : प्लॅनिंग भाजपचे, स्वबळ काँग्रेसचे, सुशेगात राष्ट्रवादी

मुक्काम पोस्ट महामुंबई : प्लॅनिंग भाजपचे, स्वबळ काँग्रेसचे, सुशेगात राष्ट्रवादी

googlenewsNext

अतुल कुलकर्णी,
संपादक, मुंबई 

प्रत्येक वॉर्डाची लोकसंख्या किती आहे? त्या ठिकाणची जातीय समीकरणे कशी आहेत? कोणत्या वाॅर्डात किती परप्रांतीय मतं आहेत? मराठी मतांची काय स्थिती आहे? मागच्या निवडणुकीत तेथे कोण उभे होते? कोणाला किती मते मिळाली? किती मतांनी कोणत्या पक्षाचा उमेदवार पराभूत झाला? आता तेथे निवडणूक लढवायची असेल तर काय केले पाहिजे? या आणि अशा बारीकसारीक सगळ्या प्रश्नांची उत्तर आज तरी फक्त मुंबई भाजपकडे आहेत. प्रत्येक वॉर्डाचे त्यांनी गोळा केलेले तपशील आणि त्यासाठी केलेली तयारी एकीकडे आणि अन्य सर्व पक्षांची अवस्था दुसरीकडे हे आजचे मुंबईतले चित्र आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात चोवीस तास राजकारणाचा विचार करणारे आणि त्यानुसार वागणारे एकमेव नेते म्हणून शरद पवार यांचा उल्लेख होतो. त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी काय केले माहिती नाही; पण भाजपने त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांना चोवीस तास कसे व्यस्त ठेवता येईल, याचे नियोजन करून ठेवले आहे. मराठी मतांची बेगमी करण्यासाठी आशिष शेलार यांच्याकडे भाजपने मुंबईचे अध्यक्षपद देऊ केले आहे, तर गुजराती आणि अन्य भाषिक मतांसाठी मुंबईचे पालकमंत्रिपद मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिले आहे.

दुसरीकडे काँग्रेस राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेकडे नजर लावून बसली आहे. राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात येईल आणि त्यातून चित्र बदलेल या आशेवर मुंबई काँग्रेसचे नेते आहेत. कोणालाही पूर्ण स्वातंत्र्य देऊन काम करू दिले जाईल, अशी अवस्था मुंबई काँग्रेसमध्ये नाही. भाई जगताप यांना अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांनी पक्षात थोडीबहुत जान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी दिलेला स्वबळाचा नारा कितपत टिकून राहतो याचे उत्तर त्यांच्याकडेच नाही. ग्राऊंडवर कार्यकर्त्यांना कार्यक्रम नाही. मुस्लिम, परप्रांतीय मतं आपल्यालाच मिळतील, हा अती आत्मविश्वास आपलीच अडचण करेल, असेही त्यांना वाटत नाही. शिवसेनेसोबत पडद्याआड जागांची वाटणी करण्याबद्दल कसल्या बैठका नाहीत. उद्धव ठाकरे सरकार पायउतार होण्याच्या आधीच ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. वॉर्डांचे नियोजन करा, कोण कोणत्या जागा लढवायच्या यासाठीची आखणी करा, असे सांगितले; पण त्यासाठी मुंबई काँग्रेसचे नेते तयार नाहीत. शिवसेनेची मतं आपल्याला मिळणारच नाहीत यावर त्यांचे ठाम मत आहे. मुंबईत काँग्रेस स्वतंत्रपणे लढली तर आजच्या घडीला ती वीस ते पंचवीस जागांच्या वर जाऊ शकत नाही. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना असे एकत्र लढले तर ही संख्या आणखी कमी होऊ शकते, असे काँग्रेस नेत्यांना वाटते. काँग्रेस नेत्यांपैकी प्रिया दत्त, मिलिंद देवरा, संजय निरुपम, वर्षा गायकवाड, चरणजित सिंग सप्रा, चंद्रकांत हंडोरे हे नेते एकत्रितपणे पक्षाचा कार्यक्रम घेऊन मुंबईत समोर यायला तयार नाहीत.

शिवसेनेला त्यांच्याकडे असणारे विद्यमान आमदार आपल्या सोबत राहतील की नाही याची खात्री नाही. एकनाथ शिंदे किती आमदारांना स्वतःकडे नेतात या प्रश्नाची टांगती तलवार कायम त्यांच्या डोक्यावर आहे. पक्षात फूट पडल्याने शिवसेनेच्या निवडणूक तयारीलाही खीळ बसली आहे. आमदार गेले, किती नगरसेवक जातील याची शाश्वती नसल्याने काय करायचे हा गोंधळ शिवसेनेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईचा चेहरा अशी ओळख असणारे नवाब मलिक तुरुंगात आहेत. त्यांची जागा घेऊ शकेल असा एकही चेहरा मुंबईत राष्ट्रवादीकडे नाही. स्वतःला राज्याचे नेते म्हणवणारे राष्ट्रवादीचे नेते मुंबईत महापालिकेच्या दृष्टीने कोणतीही हालचाल करताना दिसत नाहीत. प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघाचा सुभेदार आहे. अनुराग ठाकूर, निर्मला सीतारामन किंवा भाजपचे अन्य मंत्री, नेते आयुष्यात कधी ज्या जिल्ह्यात गेले नव्हते, त्या जिल्ह्यात जाऊन दोन-दोन, तीन-तीन दिवस मुक्काम करत आहेत. मात्र, रोज मुंबईला येणारे राष्ट्रवादीचे नेते मुंबईत पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने कसलीच हालचाल करताना दिसत नाहीत. कोणत्याही नेत्याला भाजपसोबत थेट भांडण घ्यायची इच्छा नाही, असे त्यांचे वागणे बोलणे आहे. 

राज ठाकरे यांचा वेगळा फंडा आहे. ज्यावेळी आपली ताकद कमी असते, त्यावेळी कमी वेळेत मोठा आवाज केला की त्याचा योग्य तो परिणाम साधता येतो, या सूत्रावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांची अजूनही झाकली मूठ आहे. निदान त्यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणे, वॉर्डनिहाय नियोजन करणे तरी सुरू केले आहे. 

नवरात्रीत वॉर्डात होणार प्रचार
निवडणुकांचा कार्यक्रम जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत हेच चित्र कायम राहील. त्यामुळे मुंबईत २४ तास निवडणुकीचे राजकारण करणारा भाजप विरुद्ध हतबल असलेले विरोधी पक्ष असा सामना रंगणार आहे. त्यात शिवसेनेला भावनिक मुद्द्यांवर भर देण्याशिवाय पर्याय नाही. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत प्रत्येकाने आपापल्या वॉर्डात प्रचार, प्रसार करून घेतला. आता नवरात्रीचे नऊ दिवस सगळ्यांना मिळाले आहेत. प्रचाराच्या या नुरा कुस्त्या आहेत. खरी लढाई दिवाळीनंतर सुरू होईल. त्यावेळी अनेक नेत्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसू लागतील.

Web Title: mukkam Post Mahamumbai spacial article on upcoming elections mumbai planning bjp ncp congress shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.