Join us  

एमफिल रद्द करण्याचा पुनर्विचार व्हावा; थेट पीएचडी करण्याचा मार्ग केला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 1:41 AM

विद्यार्थी, प्राध्यापकांची विविध मते

मुंबई : आता पीएचडीसाठी आधी एमफील न करता थेट पीएचडी करण्याचा मार्ग राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने खुला केला आहे. या धोरणाने एमफिलचा अभ्यासक्रम संपुष्टात आणला आहे.आधीच मागणीत आणि विद्यार्थी संख्येत घट झालेल्या एमफिलचा अभ्यासक्रम बंद करण्यात येणार असल्याच्या शैक्षणिक धोरणातील या निर्णयाला अनेक प्राध्यापक, शिक्षक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे, तर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संशोधनाचा मूळ पाया एमफिलमुळे तयार होत असतो. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करून एमफिलसंदर्भात आवश्यक नियमावली तयार करण्याची मागणी विद्यार्थी, प्राध्यापकांमधून होत आहे.सुरुवातीच्या काळात एमफील आणि पीएचडी पदव्यांसाठी काही राखीव क्रेडिट्स व त्या अनुषंगाने मिळणारे लाभ यामुळे एमफिलचे प्रत्येक विद्यापीठातील, अभ्यासक्रमातील प्रस्थ वाढले होते. एमफिलचा वापर सामान्यत: प्रगत संशोधन कार्यात प्रशिक्षण म्हणून केला जात असल्याने अनेक प्राध्यापक केवळ लाभासाठी एमफिल पदवी प्राप्त करायचे. मात्र पीएचडीकडील मूळ संशोधनाकडे त्यांचा ओढा कमी असायचा. २००९मध्ये यूजीसीकडून जारी करण्यात आलेल्या यासंबंधीच्या दुरुस्तीमध्ये या सर्व लाभांची व्याप्ती बंद करण्यात आली आणि तेव्हापासून एमफिल अभ्यासक्रमाला उतरती कळा लागल्याची माहिती मुक्ता संघटनेचे महासचिव प्रा. सुभाष आठवले यांनी दिली.शिवाय नेटसेटचा पर्याय उपलब्ध असल्याने कालांतराने विद्यार्थी, प्राध्यापकांचा याकडे ओढाही कमी होऊ लागला आहे. त्यामुळे एमफिल अभ्यासक्रम रद्द केल्याने विशेष असा परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्रात एमफिल करणारे शरद (विद्यार्थ्याचे नाव बदलले आहे) सांगतात की, नवीन शिक्षण धोरणात एमफिल अभ्यासक्रम रद्द करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे आणि हा अभ्यासक्रम चालूच राहिला पाहिजे. आपल्या देशात जिथे संशोधनासाठी संसाधनांचा अभाव आहे. एमफिलसारख्या संशोधन अभ्यासक्रमांची गरज आहे, कारण ते पीएचडीतील संशोधनासाठी पाया ठरू शकतात. आपल्या समाजात बऱ्याच असमानता आहेत. अशा परिस्थितीत, एमफिल कोर्स त्या वंचित आणि मागास भागातील विद्यार्थ्यांना संशोधन समजून घेण्यास मदत करते.जोपर्यंत देशातील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर संशोधनाचे वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत एमफिल सुरूच राहावे, असे मत विद्यार्थी व्यक्त करत आहेत.एमफिल काय आहे ?एमफिल म्हणजे ‘मास्टर आॅफ फिलॉसॉफी’ आणि पीएचडी म्हणजे ‘डॉक्टर आॅफ फिलॉसॉफी’ या एकमेकांना पूरक पदवी समजल्या जातात. दोन्ही अभ्यासक्रम संशोधन आधारित असून अभ्यासक्रमांमध्ये अभ्यासाची रचना जवळजवळ सारखीच असली, तरीही त्या दोघांमध्ये काही फरक आहेत. एमफिल केलेल्या विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी प्रवेश घेताना पूर्वपात्रता परीक्षेपासून आतापर्यंत सूट मिळत होती.