मुंबईच्या हॉटेलमध्ये खासदाराची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये अधिकारी अन् माजी मंत्र्याचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 01:10 AM2021-02-23T01:10:40+5:302021-02-23T06:58:32+5:30

या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.

MP commits suicide in Mumbai hotel; Name of officer and former minister in suicide note | मुंबईच्या हॉटेलमध्ये खासदाराची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये अधिकारी अन् माजी मंत्र्याचे नाव

मुंबईच्या हॉटेलमध्ये खासदाराची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये अधिकारी अन् माजी मंत्र्याचे नाव

Next

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर (५९) यांनी मरिन ड्राइव्ह येथील सी ग्रीन साउथ हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाइड नोट जप्त केली असून, त्यात गुजरातचे अधिकारी आणि माजी मंत्र्याची नावे असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.

डेलकर हे सी ग्रीन साउथ हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरील रूममध्ये थांबले होते. सकाळी ११ वाजता त्यांच्या चालकाने फोन केला. मात्र, तो त्यांनी उचलला नाही. बरेच कॉल केल्यानंतरही त्यांनी ते न उचलल्याने चालकाने याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनीही त्यांंना फाेन केले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीही कॉल केले. मात्र, काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर रूमच्या दुसऱ्या चावीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. डेलकर हे सात वेळा खासदार हाेते. तणावातून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज असून, सुसाइड नोटच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहेत. 

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले  

दरवाजा न उघडल्याने दुपारी १२च्या सुमारास याबाबत हॉटेलकडून पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार, मरिन ड्राइव्ह पोलीस तेथे दाखल झाले. दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. डेलकर यांच्या चालकाने बाजूच्या विंगमधील पाचव्या मजल्यावरील गॅलरीतून त्यांच्या गॅलरीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. यात तो खाली कोसळणार होता. हे त्याच्या जिवावर बेतले असते. मात्र, मालकाकडे जाण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. अखेर तो गॅलरीत उडी घेण्यात यशस्वी झाला. त्यावेळी डेलकर हे शालच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. 

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा 

डेलकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. मोहन डेलकर यांच्या मृतदेहाशेजारी गुजराती भाषेत लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांना सापडली. या नोटमध्ये गुजरातच्या काही बड्या अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश असल्याचे समजते. मात्र, ही नावे नेमकी कोणाची आहेत याबाबत पोलिसांकडून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

Web Title: MP commits suicide in Mumbai hotel; Name of officer and former minister in suicide note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.