Join us  

मुंबई विद्यापीठात आंदोलन : विद्यार्थी घेणार कुलगुरूंची भेट, निकालाचा प्रश्न मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 6:23 AM

मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिकांमुळे झालेल्या गोंधळामुळे आता विद्यार्थी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. विद्यापीठाचे परीक्षा आणि निकालासंदर्भातल्या न संपणाºया प्रश्नांविरुद्ध मंगळवारी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले.

मुंबई :मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिकांमुळे झालेल्या गोंधळामुळे आता विद्यार्थी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. विद्यापीठाचे परीक्षा आणि निकालासंदर्भातल्या न संपणाºया प्रश्नांविरुद्ध मंगळवारी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. येत्या चार ते पाच दिवसांत निकालाचा प्रश्न मार्गी न लावल्यास, विद्यापीठातच ठाण मांडून बसण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. बुधवारी फोर्ट कॅम्पसमध्ये प्रभारी कुलगुरूंबरोबर विद्यार्थी चर्चा करणार आहेत.

‘मुंबई विद्यापीठ वाचवा आंदोलन’ आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. मंगळवारी झालेल्या आंदोलनात माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर सहभागी झाले होते.

कुलगुरूंवर कारवाई झाली, पण ज्या कंपनीला कंत्राट दिले आहे, तीच कंपनी पुढच्या परीक्षेसाठी काम करणार आहे, याला आमचा विरोध आहे. त्यामुळे मेरिट ट्रॅक कंपनीवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे, तसेच आता विद्यापीठावर कार्यरत असणारे अधिकारी हे प्रभारी आहेत. त्यामुळे राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आमचे प्रश्न मांडायचे आहेत, पण त्यापूूर्वी बुधवारी दुपारी प्रभारी कुलगुरूंची भेट घेणार आहोत. त्यांच्यासमोर प्रश्न मांडणार आहोत, असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. अमोल मातेले यांनी सांगितले.

राज्यातील विद्यापीठांमध्ये सध्या मुंबई विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे, जिथे प्रमुख पदांचा भार हा प्रभारी खांद्यावर आहे. त्यामुळे परीक्षा शुल्कवाढ प्रश्नावर तोडगा निघू शकत नाही. विद्यार्थ्यांचे निकालही वेळेत लागत नाहीत. अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आंदोलने केली, तरीही अधिकाºयांकडे अधिकारी नसल्याने फक्त आश्वासन मिळत आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलपतींना ईमेल केला आहे. त्यात सर्व पदांवर कायमस्वरूपी व्यक्तींची नेमणूक करावी, अशी मागणी केली असल्याचे स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले....अशीही परीक्षा : विधि अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या प्रीती सिंग यांना एका पेपरमध्ये एका गुणाने नापास केले आहे. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता, पण त्यात गुण कमी झाल्याने, आता त्यांनी दोन आठवड्यांपूर्वी छायांकित प्रतीसाठी अर्ज केला आहे. आता त्या सात महिन्यांच्या गर्भवती आहेत. विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे आता नवव्या महिन्यांत त्यांना एटीकेटीची परीक्षा द्यावी लागणार आहे.प्रतीक्षा तरीही संपलेली नाही

मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा नवीन उपक्रम सपशेल नापास झाला असून, नोव्हेंबर महिना उजाडूनही विद्यार्थ्यांना परीक्षा भवनाच्या पायºया झिजवाव्या लागत आहेत. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत सुमारे तीन हजार उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते.विद्यापीठाने हे सर्व राखीव निकाल संकेतस्थळावर जाहीर केल्याचे सांगितले आहे, पण अजूनही विद्यार्थ्यांना निकाल न मिळाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना निकाल मिळाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा व मूल्यमापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ